<
जळगाव – (प्रतिनिधी)
शहरात फायनान्सद्वारे सुलभ हफ्त्याने महागडा मोबाईल विकत घेऊन त्याचे हफ्ते न भरता एकास गंडा घातल्याचा प्रकार घडला. याबाबत संबंधित व्यक्तीवर एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, व्यवसायाने हातमजुर असलेले शेख मुस्तफा शेख इब्राहिम (वय ४१) रा. मेहरूण, दत्त नगर, जळगाव हे त्यांच्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. कालांतराने त्यांची ओळख शफीक शेख कासम रा. काट्याफाईल, शनीपेठ, जळगाव या इसमाशी झाली.
दरम्यान शेख मुस्तफा यांचा विश्वास संपादन करत शफीक शेख याने शेख मुस्तफा यांचे नावे ५ जानेवारी २०२२ रोजी बजाज फायनान्सद्वारे २५ हजार ९९० रुपये मूल्य असलेला महागडा मोबाईल खरेदी केला परंतु शफीक याने खरेदी केलेल्या मोबाईलचे पुढील हफ्ते भरले गेले नसल्याचे शेख मुस्तफा यांच्या निदर्शनास आल्यावर त्यांनी तात्काळ एमआयडीसी पोलीस ठाण्यात धाव घेतली.
शेख मुस्तफा यांच्या तक्रारीवरून, गुरुवार २८ जुलै रोजी शफीक शेख याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पो.उप.नि. दिपक जगदाळे करीत आहेत.