<
पाचोरा – (प्रतिनिधी)
आईवडील त्यांच्या अपत्यांना लाडाने, प्रेमाने वाढवितात. त्यांचे पालनपोषण करतात. कारण त्यांना ही अपेक्षा असते की त्यांच्या उतार वयात, शेवटच्या काळात याच मुलांनी त्यांचा आधार व्हावा. परंतु पुढे हीच मुले आईवडिलांची अवहेलना करत त्यांना वाऱ्यावर सोडून देतात. अशीच एक घटना पाचोरा येथे घडली असून, या घटनेत मुलांनी त्यांच्या आईवडिलांची संपत्ती बळकावत जन्मदात्या आईला वाऱ्यावर सोडले.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, भीमाबाई पुंडलिक सावळे (वय ७०, रा. डोंगरगाव, ता. पाचोरा, जि. जळगाव)
यांना दोन मुले व तीन मुली अशी अपत्ये असून त्यांच्या तिन्ही मुली विवाहित आहेत. या विवाहित मुलींपैकी द्वितीय कन्या गतवर्षी कोरोनामुळे मरण पावली. व्यवसायाने शेतीकाम करणारा मुलगा धनराज व पाचोरा एसटी डेपोत नोकरीला असलेला मुलगा आत्माराम या दोघांनी भीमाबाई यांना “आता तुम्ही म्हातारे झाले आहेत, त्यामुळे तुम्हाला सोसायटी किंवा बँक कर्ज काढणे करिता पाचोरा येथे जाणे अवघड होईल म्हणून तुमच्या नावावरील जमीन आमच्या दोघा भावांच्या नावावर करून द्या” असे म्हणत आईवडिलांकडून जमीन नावावर करून घेतली. सावळे दाम्पत्यानेही मुलांवर विश्वास ठेवून जमीन त्यांच्या नावावर करून दिली पण काही दिवसातच दोघा भावांनी त्यातील दीड एकर जमीन १३ लाख रुपयात व पाचोरा येथील राहते घर १८ लाख रुपयात विकून त्यांच्यावर झालेले कर्ज काही प्रमाणात फेडून टाकले.
त्यानंतर दोघा भावांमध्ये आपसात भांडणे सुरू झाली. मागील दोन वर्षांपूर्वी दोन्ही भावांनी वेगळे निघून त्यांच्यावरील असलेले सरकारी व सावकारीचे ४५ लाख रुपये कर्ज अर्धे अर्धे वाटून घेतले. मोठा मुलगा धनराज याने आईवडिलांचा सांभाळ करण्यासाठी दीड एकर जमीन जास्त घेतली. परंतु काही दिवसानंतर त्याने लहान भाऊ आत्माराम यास “तू आईला सांभाळ, मी वडिलांना सांभाळतो” असे म्हणत भीमाबाईंना त्याचेकडे सोडून दिले.
त्या दिवसापासून आत्माराम भीमाबाईंचा अतोनात छळ करत आहे तसेच त्यांना जेवणही देत नाही आहे, त्यामुळे भीमाबाई चार-पाच महिने त्यांच्या मोठ्या मुलीच्या मुलाकडे राहिल्या. परंतु स्वाभिमानी असलेल्या भीमाबाई यांना दुसऱ्यांकडे इतके दिवस राहणे पटत नसल्याने त्या परत आत्मारामकडे गेल्या असता, त्याने त्यांना घरात घेतले नाही म्हणून त्यांनी त्यांच्या नातवाला मूळगावी सोडण्यास सांगितले असता, मोठ्या मुलानेही आईला घरी घेण्यास टाळाटाळ केली. हे पाहून भीमाबाई ह्या “मी भीक मागून खाईल” म्हणत स्वतःच्या मूळगावी गेल्यावर तेथे मोठा मुलगा, सून, नातू यांनी त्यांना शिवीगाळ केली. एवढेच नव्हे तर शेजारच्यांनीही भीमाबाईंना काही खाण्यापिण्यास दिल्यास त्यांनाही शिवीगाळ करत असे.
यामुळे भीमाबाई यांची अवस्था अत्यंत बिकट झालेली असून, त्यांना दोन वेळेचे जेवणही मिळणे कठीण झाले आहे. जर कधी भीक मिळाली नाही, तर शेजारचे लोक त्यांना खायला-प्यायला देतात. कोटी रुपयांची संपत्ती असूनही सावळे दाम्पत्य जेवणाला पारखे झालेले आहे.
याची दखल घेत पाचोरा तालुक्यातील काही स्वयंसेवी संस्था उपविभागीय अधिकारी, पाचोरा यांना निवेदन करून भीमाबाई व त्यांच्या पतीने मुलांच्या नावे केलेल्या जमिनीचे खरेदीखत रद्द करण्यासाठी प्रयत्न करणार आहेत. या अगोदरही अमळनेर येथील अशाच मुलांनी आपल्या आईवडिलांचा छळ केल्यामुळे उपविभागीय अधिकारी, अमळनेर यांनी मुलांच्या नावावर केलेले संपत्तीचे खरेदीखत रद्द केलेले आहे.
त्याचबरोबर त्यांच्या संपूर्ण संपत्तीचे खरेदीखत रद्द करून सदर संपत्ती पुन्हा भीमाबाई व त्यांच्या पतीच्या नावे करण्याबाबत मुख्यमंत्री महोदयांची भेट घेऊन कडक कारवाई करण्यासाठी सत्यमेव जयते न्यूज चॅनेलच्या टीमकडुन पाठपुरावा केला जाणार आहे.
कठोर शिक्षा झाली पाहिजे. यांच्या वर