<
जळगाव-(प्रतिनिधी)-एसडी-सीड म्हणजेच सुरेशदादा शैक्षणिक व उद्योजक विकास योजना गेल्या पंधरा वर्षांपासून आपल्या जळगाव जिल्ह्यातील गुणवंत, आर्थिकदृष्ट्या कमकुवत विद्यार्थ्यांचे शैक्षणिक जीवन प्रकाशमान करण्याचे कार्य अविरतपणे करीत आहे. २००८ सालापासून आज पर्यंत १४३०० हून अधिक विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती प्रदान करण्यात आली असून ३४६९ विद्यार्थ्यांनी त्यांचे शिक्षण पूर्ण केले आहे. विविध कार्यशाळा, व्याख्यानाच्या माध्यमातून सुमारे ४२१८७ विद्यार्थ्यांना प्रशिक्षित केले आहे.
एसडी-सीडच्या अध्यक्षा सौ. रत्नाभाभी जैन आणि कार्याध्यक्षा मीनाक्षीताई जैन यांनी नेहमीच मध्यमवर्गीय आणि ग्रामीण भागातील विद्यार्थी हा केंद्रबिंदू मानून तो जागतिक आव्हानांशी सामना करण्यास सक्षम व्हावा, त्यांना उत्कृष्ट दर्जाचे शिक्षण मिळावे यासाठी प्रयत्नशील आहेत. त्यांच्या दूरदृष्टीमुळे आणि अमूल्य मार्गदर्शनातून विद्यार्थ्यांसाठी नियमित वेगवेगळे उपक्रम राबविण्यात येत आहेत.
त्याचच एक नवीन अध्याय म्हणून दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणाची तयारी करवून त्यांना योग्य मार्गदर्शन करण्यासाठी, त्यांची आकलनशक्ती आणि आवड असलेल्या क्षेत्रात पदार्पण करून त्यांच्या करिअरला योग्य दिशा मिळावी या उद्देशाने एसडी सीड तर्फे मोफत करिअर मार्गदर्शन व समुपदेशन करण्यात येणार आहे . त्यासाठी शिक्षणक्षेत्रातील तज्ञ मार्गदर्शकांची नेमणूक करण्यात आली आहे.
दहावी उत्तीर्ण झाल्यावर योग्य करिअर निवड करणे हे विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाचे असते. या काळात त्यांच्यात ताणतणाव निर्माण होण्याची शक्यता असते. यातूनच अनेक विद्यार्थी टोकाचे पाऊले उचलतात. त्यामुळे दहावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेपूर्वी व निकालानंतर समुपदेशन करण्याचा, त्यांना करिअर मार्गदर्शन करण्याचा संकल्प करण्यात आला आहे.
या उपक्रमा अंतर्गत विद्यार्थ्यांचा ताणतणाव कमी करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. तसेच दहावी नंतर करिअर संबंधी मार्गदर्शन केले जाणार आहे. एसडी सिड करिअर कौंसेलिंग उपक्रमाचे प्रोजेक्ट लीडर डॉ. विवेक काटदरे व प्रा. सुरेश पांडे आणि एसडी-सीड सोबत या कार्यात जुळलेले जिल्ह्यातील शिक्षण क्षेत्रातील तज्ञ समुपदेश यांच्या मार्गदर्शनात विद्यार्थ्यांना कौंसेलिंग केले जाणार आहे.
जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना समुपदेशनाची गरज वाटल्यास, तसेच करिअर मार्गदर्शनाची आवश्यकता असल्यास त्यांनी 7507778592 या क्रमांकावर किंवा [email protected] या मेल आयडी वर संपर्क करून नोंदणी करायची आहे. नोंदणी झालेल्या विद्यार्थ्यांसाठीच ही सुविधा उपलब्ध असणार आहे.
मोफत करिअर कौन्सिलिंग सुविधा विद्यार्थ्यांच्या जीवनात नक्कीच अमुलाग्र बदल घडविणारं आहे ही खात्री आहे. तेव्हा या सुवर्ण संधीचा जिल्ह्यातील दहावीत शिक्षण घेत असलेल्या व उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनी अवश्य लाभ घ्यावा असे आवाहन एसडी सीड अध्यक्ष सौ. रत्नाभाभी जैन, कार्याध्यक्षा मीनाक्षीताई जैन, गव्हर्निंग बोर्ड चेअरमन डॉ. प्रसन्नकुमार रेदासनी, करिअर कौन्सेलिंग प्रकल्प प्रमुख डॉ. विवेक काटदरे, प्रा. सुरेश पांडे यांनी पत्रकान्वये केले आहे.