<
मुंबई – (प्रतिनिधी)
शिवसेनेचे मुख्य प्रवक्ते व खासदार संजय राऊत यांना सक्तवसुली संचालनालय अर्थात ‘ईडी’ ने काल सकाळी ७ वाजेच्या सुमारास ताब्यात घेतले असून, मध्यरात्री ईडीद्वारे राऊतांच्या अटकेची अधिकृत घोषणा करण्यात आली.
मिळालेल्या अधिक माहितीनुसार, तब्बल साडेपंधरा तासांची कसून चौकशी केल्यानंतर या अटकेवर शिक्कामोर्तब करण्यात आला तसेच ईडीच्या अधिकाऱ्यांना छापेमारी करतेवेळीस संजय राऊत यांच्या घरात साडेअकरा लाख रुपये आढळल्याचे वृत्तही झळकत आहे.
याबाबत स्पष्टीकरण देतांना राऊत यांनी यातील दीड लाख रुपये त्यांचे स्वतःचे आहे व उर्वरित दहा लाख रुपयांची बंडले, ज्यावर ‘एकनाथ शिंदे अयोध्या’ लिहिलेले आहे, ते जप्त करण्यात आले.
दरम्यान, आज राऊतांना न्यायालयात हजर करण्यात आले असता, ईडीच्या वकिलांनी संजय राऊत हे सदर प्रकरणाच्या तपासात कोणत्याच प्रकारचे सहकार्य करत नसून, त्यांना ८ दिवसांची कोठडी मिळावी अशी मागणी केली. यावर न्यायालयाने सदर मागणी फेटाळत संजय राऊतांना ४ ऑगस्ट पर्यंतची कोठडी सुनावली आहे.