<
किशोरावस्था एक संवेदनक्षम पण थोडा-फार वादळी कालखंड… शरीराच्या, मनाच्या पातळीवर अनेक बदल घडून येण्याचा काळ… अजूनही या वयात मुला-मुलींनी शरीरात होणाऱ्या बदलांविषयी घरात किंवा घराबाहेर मोकळेपणानं बोलावं असं वातावरण नाही. कुणाला काही विचारलं तर योग्य उत्तरं मिळतीलच याची खात्रीही नसते. यातूनच मुला-मुलींमध्ये स्वतःच्या शरीराबद्दलचे, लैंगिकतेबद्दलचे निकोप दृष्टीकोन रुजण्यात अडचणी येतात. याचा भावनिक विकासावर तर परिणाम होतोच पण नातेसंबंधांवरही होतो.
इतर मुला-मुलींप्रमाणेच अंध, मूक-बधीर, मतिमंद असं कोणत्या ना कोणत्या कारणाने अपंगत्व असणारी मुलंही वयात येत असतात. कारण किशोरवय हा टप्पा तर सर्वांच्याच आयुष्यात येतो. किशोरवयात शरीरात, मनात होणाऱ्या बदलांविषयी, लैंगिकतेविषयी योग्य माहिती मिळणं जास्त गरजेचं असतं. किशोरवयात होणाऱ्या बदलांचे, प्रश्नांचे गोंधळ तुम्हां मुलां-मुलींनाही साहजिकच जाणवत असणार. लैंगिक भावना तितक्याच तरल असू शकतात. पण तुलनेने किशोरवयाचा घरात आणि एकूण समाजातही तितका विचार केला जात नाही असं दिसतं. अशा अनेक गोष्टी लक्षात घेऊन या पुस्तकाची निर्मिती होत आहे. योग्य वयातच मुला-मुलींना शरीरात, मनात घडून येणाऱ्या बदलांबद्दल, लैंगिकतेबद्दल अचूक माहिती तर मिळावीच पण सकारात्मक दृष्टीकोनही रुजावा या विचारांतून हे पुस्तक आकाराला आलं आहे.
गोष्ट शरीराची… मनाची… हा एक संच आहे – मुलांसाठी ब्रेल लिपीतील पुस्तक, ऐकून आणि संवादामधून शरीर- मन समजावं म्हणून सी.डी. आणि पालकांना व शिक्षकांना याबाबतीत मुलांशी संवाद साधता यावा म्हणून पालक व शिक्षकांसाठी मार्गदर्शन पुस्तिका. हा संच किशोरवयातील लहान-मोठ्या वयोगटानुसार विभागला आहे. या पुस्तकात अनेक छोट्या-मोठ्या गोष्टी शरीर आणि मनाचं शास्त्र सांगत सकारात्मक पद्धतीने फुलविल्या आहेत. या पुस्तकाची निर्मिती होण्यात श्रीमती विमलाबाई नीलकंठ जटार ट्रस्ट यांचे अर्थसाहाय्य मिळाले आहे.
गोष्ट शरीराची… मनाची… हा संच अधिकाधिक अंध मु ला-मुलींपर्यंत पोहचावा या उद्देशाने अंध मुलांसाठीच्या शाळा, संस्था, फोरम यांबरोबर तथापि काम करू इच्छिते. तसेच पुस्काविषयीच्या अधिक माहितीसाठीही खालील पत्त्यावर अवश्य संपर्क साधा…
तथापि ट्रस्ट, फ्लॅट क्र. १, ७३,
संगम सोसायटी, बिबवेवाडी, सातारा रोड, पुणे ४११०३७
फोन – 82370 24849 ई मेल – [email protected]
वेबसाईट: www.tathapi.org
8237024849
वरचा नंबर बदललेला आहे, हा नवीन नंबर टाका