<
लाइफस्टाइल
हिंदू धर्मात सर्वात पवित्र मानला जाणारा श्रावण म्हणजे व्रत आणि उपवासाचा महिना. या महिन्यात विशेषकरून महिला व मुली भगवान श्री शंकराची पूजा, आराधना करतात. या व्रतादरम्यान केल्या जाणाऱ्या उपवासालाही अनन्यसाधारण असे महत्व असून, सामान्य महिला नेहमी या उपवासाच्या वेळी साबुदाण्याची खिचडी करतात. चला तर मग तुमच्या उपवासात नवेपण आणण्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत उपवासाचे बटाटेवडे. जाणून घेऊया या रेसिपीसाठी लागणारे साहित्य व कृती….
साहित्य –
१) दोन ते तीन उकडलेले बटाटे
२) एक चमचा भाजलेल्या जिऱ्याची पूड
३) आल्याचा लहानसा तुकडा
४) अर्धा वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर
५) एक लहान वाटी वरीच्या तांदळाचे (भगरीचे) पीठ
६) एक लहान वाटी भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट
७) तीन ते चार हिरव्या मिरच्या
८) लिंबाचा रस
९) मीठ (चवीनुसार)
१०) तळणासाठी तेल
कृती –
सर्वप्रथम एका भांड्यात दोन ते तीन उकडलेले बटाटे घेऊन त्यांना कुस्करून चांगले बारीक करावेत आणि मग या बटाट्यात एक चमचा जिरेपूड, हिरवी मिरची-आले यांची पेस्ट व बारीक चिरलेली कोथिंबीर घालून मिश्रण एकजीव करा. यानंतर यात चवीपुरते मीठ व लिंबाचा रस घाला. बटाट्याच्या तयार झालेल्या या मिश्रणाचे चपट्या किंवा लहान लहान गोल आकाराचे वडे करा.
आता दुसऱ्या एका भांड्यात वरीचे (भगरीचे) पीठ घेऊन त्यात शेंगदाण्याचा कूट, लाल तिखट, चवीपुरते मीठ व थंड तेल टाका. पिठाच्या या मिश्रणात थोडे थोडे मध्यम स्वरूपात पाणी टाकून मिश्रण एकत्र करा.
तयार झालेल्या पिठाच्या मिश्रणात तयार करून ठेवलेले बटाट्याचे वडे अशा पद्धतीने बुडवा की त्यांना संपूर्ण पिठाचे मिश्रण लागेल.
गॅसवर मंद आचेवर तेल तापवून त्यात हे वडे सोडा वड्यांना लाल रंग येईप्रयत्न आणि खुसखुशीत होईप्रयत्न तळून घ्यावे. अशा पद्धतीने तयार झालेले उपवासाचे बटाटेवडे उपवासाची चटणी अथवा दह्यासोबत सर्व्ह करावेत.