<
नवी दिल्ली – वृत्तसंस्था
बऱ्याचदा निवडणुकीच्या काळात बोगस मतांची प्रकरणे निदर्शनास येतात. यामुळे या गैरप्रकाराला प्रतिबंध घालण्यासाठी निवडणूक आयोगाने मतदान कार्डासोबत आधार कार्ड लिंक करण्याचा निर्णय घेतला आहे.
आधार कार्ड हे नागरिकांच्या ओळखीचे अत्यंत महत्त्वपूर्ण प्रमाण असून, ते पॅनकार्ड, बँक खाते, ड्रायव्हिंग लायसन्स इत्यादींसोबतच वोटर आयडी कार्डालाही लिंक करणे आवश्यक आहे. चला तर मग जाणून घेऊया वोटर आयडीला आधार कार्ड लिंक कसे करावे.
याकरिता सर्वप्रथम आपण राष्ट्रीय मतदान सेवा पोर्टल (National Voting Service Portal) च्या https://www.nvsp.in/ या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या.
आता या पोर्टल वर लॉगिन करा (लॉगिन करण्याकरिता आधी आपल्याला येथे युजर आयडी व पासवर्ड तयार करावा लागेल. याकरिता Login/Register या पर्यायावर क्लिक करून योग्य ती माहिती प्रविष्ट करा. रजिस्ट्रेशन झाल्यावर आपल्याला लॉगिन करता येईल.)
लॉगिन केल्यावर होमपेजवर ‘मतदार यादीमध्ये शोधा’ हा पर्याय निवडा. आपले मतदान ओळखपत्र शोधण्याकरिता आपली वैयक्तिक माहिती, निवडणूक फोटो आयडी अर्थात EPIC क्रमांक आणि राज्य इत्यादी माहिती भरा.
येथील डाव्या बाजूला आधार कार्ड क्रमांक एड करण्याच्या पर्यायावर गेल्यास तेथे एक नवीन विंडो ओपन होईल, ज्यात आपण आपल्या आधार कार्डाची संपूर्ण माहिती भरावी.
ही संपूर्ण माहिती भरल्यानंतर आपल्या आधार कार्डासोबत लिंक असलेल्या मोबाईल क्रमांक अथवा ईमेल आयडीवर एक वन टाइम पासवर्ड (ओटीपी) येईल. येथे ओटीपी एंटर करून सबमिट केल्यावर संबंधित प्रक्रिया पूर्ण होईल.
असे केल्याने निवडणूक आयोगास मतदार यादीतील डुप्लिकेट नावे बाद करण्यास मदत होईल व बोगस मतांना आळा बसेल.