लाइफस्टाइल
पावसाळ्याच्या महिन्यांत आपण आपले घर स्वच्छ ठेवण्याचा कितीही प्रयत्न केला तरी घर नेहमी अस्वच्छ होतच राहते आणि जिथे अस्वच्छता असते, तिथे झुरळ, पाल, गांडूळ, गोम व इतर कीटक हे पाहुणे म्हणून वास्तव्यास येतात. विशेषतः टॉयलेट, बाथरूम हा त्यांच्या नित्य बैठकीचा अड्डा. हळूहळू हे सर्व संपूर्ण घरात फेऱ्या मारून आजार पसरविणाऱ्या विषाणूंनाही सोबत आणतात, म्हणून आज आम्ही तुमच्या या समस्येचे निराकरण करण्यासाठी काही उपाय सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊयात काय आहेत हे उपाय….
पावसाळ्यात फिनाईलने घर पुसणे जेवढे महत्वाचे आहे, तेवढेच फिनाईलने घर पुसल्यावर लादी कोरडी करणेही गरजेचे आहे, कारण ओल्या ठिकाणी गांडूळ, माश्या यासारखे जीवजंतू लगेच ठाण मांडतात. त्याचबरोबर घुशी व उंदीर सुद्धा बाथरूम मध्ये माती पोखरून ठेवतात, ज्यातून अन्य प्राणी घरात येतात. म्हणून आपण अशी छिद्रे वेळीच बुजवावीत. तरीही या सर्वांचा प्रादुर्भाव कमी होत नसल्यास खालील उपाय करून पाहा.
१) जाड मीठ / खडा मीठ – बाथरूममध्ये व टॉयलेट मध्ये पांढरे जाड मीठ म्हणजेच खड्याचे मीठ पसरवून ठेवल्यास मीठातील क्षार या किड्यांना मारून टाकते.
२) डांबर गोळ्या – बाथरूममध्ये व घरातील सर्व कानाकोपऱ्यात नेप्थलीन बॉल म्हणजे डांबरगोळ्या पसरवून ठेवा, जेणेकरून हे कीटक येणार नाही.
३) पुदिन्याची पाने – घरात सतत झुरळ किंवा गांडूळ येत असल्यास त्यांच्या येण्याच्या ठिकाणी पुदिन्याची वाळलेली पाने कुस्करून टाका.
४) कडुलिंबाचा पाला – घरात कडुलिंबाचा पाला ठेवल्यास माशांचे प्रमाण कमी होते.
५) कापूर – शक्य असल्यास घरात एक दिवसाआड कापूर जाळा तसेच नारळाची धुरी करताना त्यात कडुलिंबाचा पाला घाला.
६) बोरिक पावडर – बाथरूम व टॉयलेटमध्ये बोरिक पावडर व ब्लिचिंग पावडर टाकून घ्या. या पावडरचा गंध खूप उग्र असल्यामुळे त्यांना एक दिवसाआड टाकावे तसेच टाकलेले पावडर काही वेळ ठेवल्यानंतर फरशी घासून धुवून काढल्यास फायदा होईल.
७) पेट्रोलियम जेली – घरातील बाथरूमचे पाईप किंवा टॉयलेट स्वच्छ करताना हा उपाय करता येईल. याठिकाणी फरशीवर किंवा टॉयलेटच्या पृष्ठभागावर पेट्रोलियम जेली पसरवून ठेवल्यास गांडूळ व अन्य सरपटणारे प्राणी तिथे अडकून पडतील.
८) व्हिनेगर – जेथून हे सर्व प्राणी, कीटक येतात तेथे एक चमचा व्हिनेगर ओतावे, व्हिनेगरच्या गंधाने या प्राण्यांचे येण्याचे प्रमाण कमी होईल.
९) बेकिंग सोडा – जर आपल्याला ब्लिचिंग पावडरचा उग्र गंध सहन होत नसेल तर यावर पर्यायी म्हणून आपण बेकिंग सोडा सुद्धा बाथरूमच्या फरशीवर टाकू शकता. कारण व्हिनेगर व बेकिंग सोड्याचे मिश्रण घातल्यास फरशी स्वच्छ राहण्यास मदत होते.