<
चोपडा – (प्रतिनिधी) – तालुक्यातील अनवर्दे ब्रु. ग्रामपंचायत सदस्य विठ्ठल देवराम पाटील व श्रीमती. आशाबाई बाळु पाटील यांना ग्रामपंचायत मालकीच्या शासकीय जागेवर अतिक्रमण केल्याचे सिद्ध झाल्याने मा. जिल्हाधिकारी मा. अभिजित राऊत , जळगाव यांनी ग्रा. विवाद क्र. २/२०२२ मद्धे श्री. गणेश शंकर पाटील व रामचंद्र कोळी, यांच्या तक्रारी वरून ग्रा. सदस्य म्हणून अपात्र ठरविले आहे.
आश्चर्याची बाब म्हणजे श्रीमती. आशाबाई बाळु पाटील यांनी आपत्रता टाळण्यासाठी चौकशी वेळी पंचफारकतीची व तदनंतर दि. २२/२/२०२२ रोजी अमळनेर येथील मे. दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर यांचे न्यायालयात हिंदु विवाह अर्ज क्र. १७/२०२२ मध्ये कलम 13 ब अन्वये परस्पर संमतीने घटस्फोट केल्याचा बचाव घेतला. परंतु सदरचा घटस्फोट हा केवळ ग्रामपंचायत सदस्य म्हणून अपात्रता टाळण्यासाठी केलेला असल्याची बाब मा. जिल्हाधिकारी जळगाव यांच्या निदर्शनास पुराव्यासह अँड. वसंत भोलाणकर, यांनी आणून दिली. तसेच पंचफारकत ही खोटी असल्याचे सिद्ध झाले त्यामुळे श्रीमती. आशाबाई बाळु पाटील, यांनी अपात्रता टाळण्यासाठी करवून घेतलेला घटस्फोट त्यांचे कामी आला नाही.
तसेच महत्वाची बाब म्हणजे ग्रा. पं. सदस्य श्री. शांताराम भिला कोळी, यांनी खाजगी मालमत्ता असतांना त्यांनी अतिक्रमण नियनुकूल करण्यासाठी प्रस्ताव mh.giv2egov.com या संकेतस्थळावर सादर केलेला असून सदरचा प्रस्ताव शासन स्तरावर प्रलंबित आहे.
असे असतांना त्यांनी शासनाची दिशाभूल करून खाजगी मालमत्ता लपवून खोट्या माहितीच्या आधारे सदर प्रस्ताव दाखल केल्याचे सिद्ध झाल्याने श्री. शांताराम भिला कोळी, यांच्या विरुद्ध योग्य ती चौकशी करून आवश्यक ती कार्यवाही करणे कामी मा. मुख्यकार्यकारी अधिकारी जि. प. जळगाव यांना मा. जिल्हाधिकारी जळगाव यांनी दि. २/८/२०२२ रोजी आदेश दिलेले आहेत. शासन निर्णयानुसार बेघर लोकांना घरे ही शासन संकल्पना व धोरण असतांना अनेक गावात खाजगी मालमत्ता व घरे उपलब्ध असतांना ग्रामस्थांनी ती लपवून ग्रामपंचायत मिळकतीवर असलेली अतिक्रमणे नियमाकुल करण्यासाठी खोट्या माहितीच्या आधारावर प्रस्ताव सादर केलेले आहेत, अशा पर्यायी घरे व खाजगी मिळकती असलेल्या अतिक्रमण धारकांच्या अडचणीत वाढ झालेली आहे, तक्रार दारातर्फे अँड. वसंत भोलाणकर यांनी कामकाज पाहिले.