<
जळगाव (स्वप्निल सोनवणे) – तालुक्यातील आव्हाणे शिवारात नुकतेच एका घटनेमुळे माणुसकीचे दर्शन घडून आले असून जगात खरच माणुसकी शिल्लक असल्याचीच प्रचिती यामुळे आली आहे.तालुक्यातील जळगाव आव्हाणे रस्त्यावरील पेट्रोल पंपाजवळ गेल्या २ दिवसांपासून जवळपास ९० वर्षांचा एक वृद्ध व्यक्ती पडला होता.त्याच्या अंगाला जखम झाली होती.यामुळेच की काय तो व्यक्ती धड बोलूही शकत नव्हता.या दोन दिवसांत या पंपाजवळून दिवसभर वाहनांची ये-जा सुरू असतानाच कोणीही वाहनधारकाने या व्यक्तीविषयी चौकशीही केली नाही.मात्र अखेर माणुसकीला पाझर फुटलाच.तेव्हा आव्हाणे येथील ईश्वर पाटील (लालासर) हे नुकतेच जळगाव रस्त्याने जात असताना त्यांना हे वृद्ध व्यक्ती दिसले व त्यांनी हे विदारक दृश्य पाहताच जळगाव ग्रामीण पोलीस स्टेशनला जाऊन याबाबत माहिती दिली व आपल्यासोबत २ कॉन्स्टेबल आणि रुग्णवाहिका आणत त्या वृद्ध व्यक्तीस सुखरूपरित्या जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.यावेळी त्यांच्या मदतीस गोविंदा धनगर व तालुका पोलिसांचीही मदत लाभली.पाटील यांच्या या मदतीमुळे त्या वृद्ध व्यक्तीस जीवदान मिळाले असून त्यांच्या या माणुसकीच्या दर्शनाचे परिसरातून कौतुक होत आहे.