<
रावेर – (प्रतिनिधी)
राज्यातील प्रत्येक भागातील रस्ते, महामार्गांवर खड्ड्यांचे वाढते प्रमाण हे अनेक लोकांच्या जीवावर बेतत असून, रावेर शहराजवळ याच खड्ड्यांमुळे एका महिलेला तिचा जीव गमवावा लागल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. आशाबाई ठाकरे (वय ४५) असे या मृत महिलेचे नाव आहे
मिळालेल्या माहितीनुसार, मोहन ठाकरे हे त्यांची आशाबाई ठाकरे यांच्यासोबत बुऱ्हाणपूर-अंकलेश्वर महामार्गावर मोटारसायकल (एमएच-१९ बीडब्ल्यू ३७२७) ने प्रवास करीत होते. प्रवासात पंजाब शाहबाबा दर्गा व मॉडर्न इंग्लिश स्कुल जवळच्या हायवेवरील खड्डा चुकविताना सदर दुचाकीच्या मागे बसलेल्या आशाबाई पडल्या व जागीच त्यांचा मृत्यू झाला.
दरम्यान, आई आशाबाई यांच्या मृत्यूला कारणीभूत मुलगा मोहन याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. तरी या महामार्गावर सातत्याने होणाऱ्या अपघातांमुळे वाहनचालकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
या प्रकरणासंदर्भात सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता चंद्रशेखर चोपडेकर यांनी सदर महामार्ग हा सार्वजनिक बांधकाम विभागाकडे नसून तो राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे वर्ग केलेला आहे, असे सांगत आपण या रस्त्यावरील खड्ड्यांची समस्या सोडवण्याचे आश्वासनही चोपडेकर यांनी दिले आहे.