<
वावडदा ता.जळगाव दि.9-(प्रतिनिधी) – आजादी का अमृत महोत्सव च्या निमित्ताने जिल्हा प्रशासन जळगावच्या वतीने श्री.प्रतापराव पाटील, जिल्हा नियोजन अधिकारी, जिल्हा नियोजन समिती कार्यालय, जळगाव, श्री. मिलींद दिक्षित, जिल्हा क्रीडा अधिकारी, जिल्हा क्रीडा कार्यालय, जळगाव, श्री.नरेंद्र डागर, समन्वयक, नेहरु युवा कल्याण केंद्र, जळगाव व कर्नल प्रविण धिमान, समादेशक, एनसीसी कार्यालय, जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने 75 सायकलपटू व 25 एन.सी.सी. कॅडेट यांची जळगाव ते साने गुरुजी स्मारक, अमळनेर 75 किमी सायक्लॅाथॅान आयोजित करण्यात आलेली होती. सदर सायक्लॅाथॅान मध्ये जळगाव, भुसावळ, चाळीसगाव, जामनेर, पाचोरा येथील साईकलिस्ट ग्रुपचे सायकलपटू व एनसीसी कॅडेट्स सहभागी झाले होते. यात प्रामुख्याने जिल्हा नियोजन अधिकारी श्री प्रतापराव पाटील तसेच समादेशक एनसीसी कर्नल प्रवीण धिमान हे स्वतः सहभागी झाले होते. आज दिनांक 9 ऑगस्ट 2022 रोजी सकाळी 6.30 वाजता जिल्हा क्रीडा संकुल, जळगांव येथे मा. श्री. अभिजीत राउत, जिल्हाधिकारी जळगाव यांनी हिरवा झेंडा दाखविल्यानंतर सायक्लॅाथॅानची सुरुवात झाली.
जळगाव .. शिरसोली .. वावडदा येथे शैलेंद्र चव्हाण. सुमित पाटील किरण पाटील यांच्या हस्ते चहापाणी चे आयोजन करण्यात आले व .. म्हसावद .. एरंडोल .. धरणगाव .. मार्गे सर्व सायकलिस्ट सकाळी 10.45 वाजता तिरंगा चौक अमळनेर येथे पोहोचले. सकाळी 11.00 वाजता तिरंगा चौक अमळनेर येथे पर्यावरण संरक्षणाची शपथ घेण्यात आली व 75 किमी सायकलिंग करुन आलेल्या 75 सायकलपटु व 25 एन.सी.सी. कॅडेट यांच्या रॅलीचे स्वागत करण्यात आले. तिरंगा चौक अमळनेर येथून सर्व सायकलिस्ट साने गुरुजी स्मारक अमळनेर येथे पोहोचले. साने गुरुजी स्मारक समितीच्या वतीने सर्व सायकलपटू यांचे स्वागत करण्यात आले. साने गुरुजी स्मारक येथे अल्पोपहार झाल्यानंतर श्री.प्रतापराव पाटील, जिल्हा नियोजन अधिकारी जळगाव, श्री.मिलींद वाघ, तहसीलदार अमळनेर, श्री.मिलींद दिक्षित, जिल्हा क्रीडा अधिकारी, जळगाव, कर्नल प्रविण धिमान, समादेशक एनसीसी, श्रीमती दर्शना पवार व साने गुरुजी स्मारकाचे सर्व विश्वस्त यांच्या हस्ते सर्व सायकलीस्ट ना मेडल व प्रमाणपत्र देऊन त्यांचा गौरव करण्यात आला.