जळगाव – (प्रतिनिधी) – इंडियन रेडक्रॉस सोसायटी अनेक सामाजिक उपक्रमाच्या माध्यमातून जळगाव जिल्ह्यात सेवा देत आहे. याचाच एक भाग म्हणून गोदावरी नर्सिंग कॉलेज येथे युथ रेडक्रॉसची स्थापना करण्यात आली. या अंतर्गत आज जागतिक अवयव दान दिनानिमित्त शहरात जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले.

या रॅलीमध्ये गोदावरी नर्सिंग कॉलेजच्या युथ रेडक्रॉस शाखेतील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. हातात जनजागृती पोस्टर, बॅनर तसेच अमृत महोत्सव वर्षानिमित्त तिरंगे झेंडे व रेडक्रॉसचे झेंडे यामुळे रॅली अतिशय चांगल्या वातावरणात पार पडली.
टॉवर चौकातून सुरू झालेल्या या अवयव दान जनजागृती रॅलीचे उद्घाटन जळगाव शहराचे आमदार माननीय श्री राजूमामा भोळे यांच्या हस्ते करण्यात आले. युथ रेडक्रॉसच्या या उपक्रमाचे त्यांनीं कौतुक केले. तसेच अवयव दानाबाबत खुप मोठ्या प्रमाणात जन जागृती ची गरज आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले. याप्रसंगी विद्यार्थ्यांनी अवयवदान जनजागृती बद्दलचे अतिशय सुंदर असे पथनाट्य सादर केले.
आपल्या अवयवदानामुळे आपण असंख्य लोकांच्या आयुष्यामध्ये आनंद देउ शकतो. प्रत्येकाने समज – गैरसमज बाजूला सारून अवयव दान करण्यासाठी पुढे आले पाहिजे असे आवाहन रेडक्रॉसचे उपाध्यक्ष गनी मेमन यांनी केले.
युवकांनी पुढाकार घेऊन अवयव दानाबाबत आणि रक्तदानाबाबत जनजागृती करावी ज्युनिअर आणि युथ रेडक्रॉसच्या माध्यमातुन असेच उपक्रम राबवू अशा शुभेच्छा ज्युनिअर व युथ रेडक्रॉसच्या चेअरमन डॉ. अपर्णा मकासरे यांनी दिल्या. या रॅलीचा टॉवर चौक – शिवाजी चौक – चित्रा चौक – आठवडे बाजार – रेडक्रॉस भवन येथे समारोप करण्यात आला.
रेडक्रॉसचे चेअरमन श्री. विनोद बियाणी यांनी सर्वांचे आभार मानले. या प्रसंगी रेडक्रॉसचे उपाध्यक्ष गनी मेमन, चेअरमन श्री. विनोद बियाणी, ज्युनिअर व युथ रेडक्रॉस चेअरमन डॉ. अपर्णा मकासरे, जनसंपर्क अधिकारी सौ. उज्वला वर्मा, रेडक्रॉसचे स्वयंसेवक कांतीलाल इंगळे, गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंग, जळगावचे प्रा. सागर मसने, प्रा. सुमित निर्मळ प्रा. प्रियंका गवई, प्रा. प्रीती गायकवाड, प्रा. पुनम तोडकर, प्रा. अक्षय वानखेडे, प्रा. दिपाली गोटे, प्रा. प्रियंका गाडेकर, प्रा. मंजिरी मंजिरी मडावे आणि विद्यार्थी उपस्थित होते.