<
मुंबई – (सायबर क्राईम न्युज) – रोजच आपण सायबर क्राईम च्या बातम्या आपण वर्तमान पत्रातुन वाचत असतो, रोजच आपल्या अवती भोवती सायबर गुन्हे घडण्याच्या घटना होत आहेत.
पोलीस प्रशासनाच्या वतीने नेहमीच नागरिकांना वेळोवेळी सायबर गुन्ह्याबाबत सतर्क राहण्याचे आवाहन करित असते तरी देखील आपण अशा घटनांचे बळी ठरत आहोत. अशिच घटना मुंबईत देखील घडली आहे.
महिलांना नोकरीच्या आमीषातून लाखो रुपयांचा गंडा घालण्यात आला आहे. याप्रकरणी बोरीवली पोलीस स्थानकात ( Boriwali Police ) तक्रार देण्यात आली असून सायबर भामट्यांनी या महिलांकडून लाखो रुपये उकळलेत.
तब्बल 8 लाख 60 हजार रुपयांचं गंडा या महिलांना घालण्यात आल्यामुळे खळबळ उडाली आहे. त्यामुळे कोणत्याही लिंकवर क्लिक करताना शंभर वेळा विचार करा, असं सांगण्याची वेळ पुन्हा एकदा आलीय. चाळीस वर्षांची बोरीवलीतील गृहिणी कामाच्या शोधात होती. तिने गुगलवर (Google Job Search) नोकरीसाठी शोध घेतला. ऑनलाईन रिचार्ज स्कीमच्या (Online Recharge Scheme Fraud) माध्यमातून पैसे कमावण्याच्या प्रकाराला या महिला बळी पडल्या आणि लाखो रुपये गमावून बसल्या. त्यामुळे ऑनलाईन कामातून घरच्या घरी पैसे कमावण्याच्या जाहिरातींना भुलून जर तुम्हीही असं काम करत असाल, तर त्या कामाची सत्यता पडताळणं आणि खबरदारी बाळगणं गरजेचं आहे, हे या घटनेनं अधोरेखित केलंय.
कमिशनच्या नावाखाली फसवणूक
12 ऑगस्ट रोजी बोरीवली पोलिसांना याप्रकरणी तक्रार नोंदवण्यात आली होती. एका गृहिणीने दिलेल्या तक्रारीनुसार, ही महिला गुगलवर नोकरीचा शोध घेत होती. त्यावेळी समोर आलेल्या एका लिंकवर तिने क्लिक केलं. यानंतर या महिलेला टेलिग्रामवर मेसेज यायला सुरुवात झाली. एका वेबसाईटवर या महिलेला रजिस्टर करण्यास सांगण्यात आलं होतं. त्यात ई-मेल आयडी, फोन नंबर आणि रिचार्ज स्किममध्ये तिला सहभागी होण्यास सांगण्यात आलं होत.
या रिचार्जच्या माध्यमातून, महिलेला पैसे कमावता येऊ शकतात, असं आधी भासवण्यात आलं. कमिशन म्हणून या ही महिला वेबसाईटवरुन पैसे कमावेल, असं आधी दाखवण्यात आलं. यासाठी आधी महिलेनं 100 रुपये भरले आणि तिला 227 रुपये मिळाले. त्यामुळे ही महिला व्यवहार करत राहिली. असं करता करता महिलेने तब्बल 5 लाख 14 हजार भरले. पण तिला पैसे येणंच अचानक बंद झालं. टेलिग्राम ऍपवरही या महिलेनं तक्रार केली. या वेबसाईटच्या एक्झिक्युटिव्हशी संपर्क साधण्याचा प्रयत्न तिने केला. पण त्याला यश मिळू शकलं नाही. अखेर वैतागून महिलेनं पोलिसात तक्रार दाखल केली.
ऑनलाईन कामाचं मायाजाळ
अशीच आणखी एक घटना 43 वर्षांच्या महिलेसोबत घडली. एका 43 वर्षांच्या महिला आधी स्टोअर मॅनेजरमधून काम करत होती. काही ऑनलाईन प्रॉडक्टमध्ये पैसे गुंतवून ऑनलाईन कमिशन मिळवता येईल, असं या महिलेला भासवण्यात आलं. नोकरी गमावल्यानं ही महिला कामाच्या शोधात होती. तिला ही संधी वाटली आणि तिने पैसे गुंतवले. 160 रुपयांचे बेल्ट या महिलेनं ऑनलाईन खरेदी केाला. आणि तिला लगेचच 240 रुपये कमिशनसह परत आल्याचा मेसेज आला. पैसे मिळत आहेत म्हणून ही महिलेने व्यवहार सुरु ठेवला आणि तब्बल 3 लाख 54 हजार इतकी रक्कम खर्च केली. पण नंतर या महिलेच्या खात्यात ना कमिशनची रक्कम आली आणि नाही खर्च केलेले पैसे. अखेर या महिलेला आपल्यासोबत फसवणूक झाल्याची जाणीव झाली आणि तिने पोलिसात याबाबत तक्रार देखील दिली आहे.