<
जळगाव – (प्रतिनिधी) – राजस्थान मधील जालोर येथे इयत्ता तिसरीचे शिक्षण घेणाऱ्या इंद्रा मेघवाल या विद्यार्थ्याच्या हत्येचा व धरणगाव येथे भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यांचे करण्यात आलेले शुद्धीकरण या दोन्ही घटनांच्या निषेधार्थ आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर महाराष्ट्र जनक्रांती मोर्चाच्या वतीने तीव्र स्वरूपाचे निदर्शने आंदोलन व घोषणाबाजी करून आंदोलकांनी जिल्हाधिकारी कार्यालयाचा परिसर दणाणून सोडला . या आंदोलनाचे नेतृत्व महाराष्ट्र जनक्रांती मोर्चाचे प्रदेश अध्यक्ष मुकुंद सपकाळे , धरणगाव पंचायत समितीचे माजी सभापती मुकुंद नन्नवरे , छावा मराठा युवा महासंघाचे जिल्हा अध्यक्ष अमोल कोल्हे , संजय सपकाळे यांनी केले.
राजस्थान येथे जालोर या गावी शाळेत अनुसूचित जातीच्या दलित विद्यार्थ्याने सवर्ण शिक्षकाच्या पाण्याच्या टाकीतून पिण्यासाठी पाणी घेतले , दलित विद्यार्थ्याने पाण्याच्या टाकीला स्पर्श केला व तो अस्पृश्य आहे असे मानुन पाणी बाटले म्हणुन शिक्षकाने इंद्रा मेघवाल या विद्यार्थ्याला बेदम व जबर मारहाण केली त्यामुळेच विद्यार्थ्याचा मृत्यू झाला . या घटनेचा आंदोलकांनी तीव्र निषेध व्यक्त करत , त्या मारेकरी शिक्षकास फाशीची शिक्षा करा अशी मागणी महामहिम राष्ट्रपती महोदया यांना जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्यामार्फत निवेदन देऊन केली.
तसेच मा. ना. गुलाबराव पाटील यांनी छत्रपती शिवाजी महाराज व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यांना वंदन करून पुष्पहार अर्पण केला व स्पर्श केला म्हणून शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख गुलाबराव वाघ आणि धरणगाव नगर परिषदेचे नगराध्यक्ष निलेश चौधरी यांनी पुरोहितांकडून पूजाविधी करत मंत्रोच्चारण करून दोन्ही पुतळ्यांचा दुग्धाभिषेक करून , दोन्ही पुतळ्यांवर गोमूत्र शिंपडले व शुद्धीकरण केले . सदर कृती अतिशय निंदाजनक असुन अंधश्रद्धा व अस्पृश्यता पसरवणारी आहे . ही घटना अंधश्रद्धा विरोधी व अस्पृश्यता विरोधी कायद्याचे उल्लंघन व भंग करणारी घटना आहे , म्हणुन संबंधित इसमांवर तातडीने कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी देखील आंदोलकांकडून करण्यात आली.
सदर आंदोलनात नगरसेवक सुरेश सोनवणे , रमेश सोनवणे , चंदन बिऱ्हाडे , महेंद्र केदारे , सुरेश तायडे , साहेबराव वानखेडे , दिलीप सपकाळे ,भारत सोनवणे , वाल्मीक सपकाळे , आनंदा तायडे , दादाराव शिरसाठ , प्रणय नन्नवरे , प्रा. प्रीतीलाल पवार , उमेश गाढे , विवेक जावळे, ऍड . राजेश गोयर , यशवंत घोडेस्वार , मिलिंद सोनवणे , चंद्रकांत नन्नवरे , बाबुराव वाघ , युवराज सुरवाडे , गुलाब कांबळे , सुभाष साळुंखे , आबा महाजन , अनिल माळी , लखन पाटील , यश भालेराव , आनंद इंगळे , पंकज नन्नवरे , विलास नन्नवरे , सुभाष नन्नवरे , कल्पेश कोळी , समाधान वाघ , मिलिंद नन्नवरे , प्रकाश मोरे , बंटी नन्नवरे , नाना ठाकरे , भिमराव सोनवणे , रवींद्र सोनवणे यांच्यासह मोठ्या संख्येने उपस्थित होते.