<
जळगाव-(प्रतिनिधी) – आज दिनांक 19 ऑगस्ट 2022 रोजी सहाय्यक आयुक्त समाज कल्याण विभाग यांच्या कार्यालयात जाऊन भारतीय राष्ट्रीय शैक्षणिक महासंघ संलग्नित एन.मुक्ता या प्राध्यापक संघटनेच्या वतीने धुळे व जळगाव जिल्ह्यातील जळगाव,अमळनेर, चोपडा, व धुळे या समाजकार्य महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या महाविद्यालयातील प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या विविध समस्या संदर्भात निवेदन देण्यात आले. याप्रसंगी मा.सहाय्यक आयुक्त श्री योगेश पाटील साहेब यांचे प्रतिनिधी व कार्यालय अधीक्षक श्री. राजेंद्र कांबळे यांच्याकडे निवेदन देण्यात आले.
यावेळी संघटनेचे केंद्रीय अध्यक्ष प्रा. डॉ. नितीन बारी, केंद्रीय सचिव डॉ. अविनाश बडगुजर केंद्रीय कार्यकारणीचे सहसचिव डॉ. नितीन बडगुजर, केंद्रीय कार्यकारणी सदस्य प्रा. डॉ. अस्मिता सरवैया समाजकार्य महाविद्यालय,अमळनेर येथील प्रा. चंद्रशेखर बोरसे व इतर उपस्थित होते प्रा. डॉ. नितीन बारी यांनी समाजकार्य महाविद्यालयाचे सातत्याने प्रश्न हे ऐरणीवर वर येत असतात समाजकार्य महाविद्यालयाच्या प्राध्यापकांचे वेतन नियमित वेळेवर न होणे ही अत्यंत अन्यायकारक बाब असून याबाबत आपण त्वरित निर्णय घ्यावा तसेच समाजकार्य महाविद्यालयातील प्राध्यापकांसाठी असलेल्या सातव्या वेतन आयोगामधील कॅसबाबत दुरुस्ती ताबडतोबिने करण्यात यावी अन्यथा संघटनेच्या वतीने आंदोलन छेडण्यात येईल असे सांगितले.
याबरोबरच समाजकार्य महाविद्यालयातील प्राध्यापकांचे सातव्या वेतन आयोगाचा फरक,कॅसचे फरक इत्यादी विषयांवर देखील सकारात्मक चर्चा करण्यात आली. कार्यालय अधीक्षक श्री राजेंद्र कांबळे यांनी उत्तर देताना सर्व निवेदनकर्त्यांच्या भावना या वरिष्ठ कार्यालयामध्ये पाठवण्यात येतील व नियमित वेतनाच्या प्रश्ना बाबत बोलताना आजच सीएमपी झाली असल्याचे सांगण्यात आले व यापुढे देखील या बाबतीत सकारात्मक कार्यवाही करण्यात येईल असे आश्वासन सहाय्यक आयुक्त योगेश पाटील यांच्या वतीने दिले. सहाय्यक आयुक्त श्री योगेश पाटील साहेब यांच्याशी संघटनेच्या वतीने दूरध्वनीवरून चर्चा करून परिस्थितीचे गांभीर्य समजावून देण्यात आले. त्यावर माननीय योगेश पाटील साहेब यांनी देखील सकारात्मक निर्णय घेण्यात येईल असे सांगितले.