<
महाराष्ट्र सरकारने भरतीवरील निर्बंध उठवल्यानंतर पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने विविध नागरी विभागांमधील तब्बल 386 रिक्त पदे भरण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.
स्थायी कर्मचार्यांच्या रिक्त जागांसाठी अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख 8 सप्टेंबर आहे, असेही त्यांनी सांगितले आहे. इंडियन एक्स्प्रेसने हे वृत्त दिले आहे. पिंपरी चिंचवड महापालिकेचे सहायक महापालिका आयुक्त वामन नेमाने यांनी सांगितले, की नागरी संस्थेच्या वेबसाइटवर पदे आणि रिक्त पदांसंबंधी सर्व माहिती अपलोड करण्यात आली आहे. ज्या उमेदवारांना या पदांसाठी अर्ज करायचा आहे त्यांनी सविस्तर माहिती वाचून त्यानुसार अर्ज करावा. त्यांनी पोस्ट तपासल्या पाहिजेत आणि त्यांची पात्रता विशिष्ट पदासाठी योग्य आहे की नाही हे पडताळून त्यानुसार अर्ज करावा, असे त्यांनी सांगितले.
जवळपास 5,000 पदे रिक्त
पिंपरी चिंचवड महापालिका अधिकाऱ्यांनी सांगितले, की राज्य सरकारने काही महिन्यांपूर्वी भरतीवरील बंदी उठवली आहे. जवळपास सात वर्षे ही बंदी लागू होती, असे ते म्हणाले. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या सूत्रांनी सांगितले, की महापालिकेमध्ये जवळपास 5,000 पदे रिक्त आहेत, ही पदे टप्प्याटप्प्याने भरली जाणार आहेत. यावरची बंदी उठवल्यानंतर पिंपरी चिंचवड महापालिकेने कर्मचारी परिचारिकांच्या भरतीसाठी एक जाहिरात जारी केली. मात्र उच्च न्यायालयाने या प्रक्रियेला स्थगिती दिली आहे.
पिंपरी चिंचवड महापालिका ज्या पदांसाठी अर्जदार शोधत आहे, त्यापैकी काही पदे –
- अतिरिक्त कायदेशीर सल्लागार (1 पद)
- कायदा अधिकारी (1)
- डेप्युटी फायर ब्रिगेड अधिकारी, लिपिक (213)
- इलेक्ट्रिकल कनिष्ठ अधिकारी (18)
- प्राणी रक्षक (2)
- आरोग्य निरीक्षक (13)
- सामाजिक कार्यकर्ते (3)
- फलोत्पादन पर्यवेक्षक (8)
- सहायक उद्यान अधीक्षक (2)
- उद्यान अधीक्षक (4)
- स्थापत्य अभियंता सहायक (41)
- कनिष्ठ स्थापत्य अभियंता (75)
लेखी परीक्षा आणि मुलाखती
सर्व पदांसाठी लेखी परीक्षा आणि मुलाखती होणार आहेत, अशी माहिती देण्यात आली आहे. कोविडमुळे अनेकांचे शैक्षणिक तसेच आर्थिक नुकसान झाले. मधील काळात भरतीही बंद होती. आता एकूण 386 जागांसाठी होणाऱ्या या भरतीसाठी इच्छुक तसेच पात्रताधारकांनी अर्ज करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.