<
शहरातील भवानी पेठेमध्ये वन विभागाने मोठी कारवाई केली आहे. शहरातील भवानीपेठेतील रामनाद मुलचंद कोगटा या दुकानात वन विभागाने छापा टाकला.
या छाप्यात वन विभागाने आठ प्रकारच्या वन्य प्राण्यांची शिकार करुन विक्रीसाठी ठेवलेले 347 प्रकारचे अवशेषासह तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे. दरम्यान, तिघा आरोपींना तीन दिवसांची वनकोठडी सुनावण्यात आली आहे.
डॉ. अजय लक्ष्मीनारायण काेगटा (वय 53, रा. जळगाव), चुनीलाल नंदलाल पवार (वय 30, रा. खेडगाव तांडा, ता. एरंडोल) व लक्ष्मीकांत रामपाल मन्यार (वय 54, रा. जळगाव) असे वन विभागाने अटक केलेल्या संशयित तिघांची नावे आहेत. वन्य प्राण्यांची शिकार करुन त्यांची तस्करी करण्यात येत असल्याची गुप्त माहिती वन विभागाला मिळाली होती. इतरही एका ठिकाणी वन्य प्राण्यांची तस्करी होत असल्याची माहिती होती. वन्य प्राण्यांच्या अवशेषांची कोगटांच्या दुकानात विक्री होत असल्याची खात्रीशीर माहिती मिळाल्यानंतर वन विभागाच्या पथकाने त्या दुकानावर छापा टाकला.
दरम्यान, हताजोडी 11 नग, राजमांजर रंगनी 11, सियारसिंगी 260, कासवपाठ एक, इंद्रजाल 38, नाग मणके 21, घुबडींची नखे 3, समुद्रघोडा 2 या वन्यप्राण्यांचे अवशेष वन विभागाच्या पथकाने दुकानातून जप्त केले आहेत. या प्रजातींचा समावेश वन्यजीव कायदा 1972 मधील परिशिष्ठ 1 व 2 मध्ये समावेश आहे. या प्राण्यांच्या शिकारीसाठी 7 वर्ष कारावासाची तरतूद आहे.
सहायक वनसंरक्षक सुदर्शन शिसव, वनपरिक्षेत्र अधिकारी, अमोल पंडित, दत्तात्रय लोंढे, वनपाल संदिप पाटील आदींच्या पथकाने ही कारवाई केली. तपास उपवनसंरक्षक विवेक होशिंग यांच्या मार्गदर्शनात करण्यात येत आहे.