<
महाराष्ट्रामध्ये १८८० सालापासून सुरू झालेल्या एलिमेंटरी व इंटरमिजिएट ग्रेड एक्साम म्हणजे खर तर शालेय स्तरावर विद्यार्थ्यांना चित्रकलेमध्ये असणारी रुची, आवड हे अजमावून पाहण्याची योग्य संधी होय.
गेली अनेक वर्ष विद्यार्थी या परीक्षेसाठी लक्षावधी संख्येने बसत आहेत.
तसेच पुढे कलेमध्ये आपले करियर ज्या विद्यार्थ्यांना करायचे आहे त्यांना या ग्रेड एक्झाम अतिशय महत्त्व पूर्ण असतात कारण फाऊंडेशन कोर्स , आर्ट टीचर डिप्लोमा , जी. डी.आर्ट., कमर्शियल आर्ट , फाइन आर्ट , इंटेरियर डिझाईन , टेक्सटाइल , फॅशन डिझायनिंग , छायाचित्र , आर्किटेक्ट किंवा विविध कला अभ्यासक्रमांच्या प्रवेश परीक्षा तसेच कला महाविद्यालयात उच्च शिक्षण घेण्यासाठी या परीक्षा आवश्यक असतात.तसेच सध्या तरी या ग्रेड परीक्षा शालेय स्तरावरील विद्यार्थ्यांच्या सर्वात लोकप्रिय अशा चित्रकला परीक्षा आहेत.ज्यामध्ये विद्यार्थ्यांना स्थिर चित्र आणि वस्तू चित्र , संकल्प चित्र , स्मरण चित्र व कर्तव्यभूमिती (प्रमाण पट्टी व अक्षर लेखन ) अशा विषयांची परीक्षा ही साधारणपणे सप्टेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात व ऑक्टोंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात दरवर्षी आयोजित केली जातात.एलिमेंटरी परीक्षेसाठी साठी ५० रुपये तसच इंटरमिजिएट परीक्षेसाठी १०० रू. शुल्क कला संचालनालय मार्फत आकारले जातात. वय वर्ष १२ चे पुढील अथवा इयत्ता ७ वी ते १० वी चे राज्य अथवा केंद्रीय शिक्षण माध्यमिक मंडळाचे विद्यार्थी या परीक्षेसाठी पात्र असतात. राज्य मंडळा मध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे इयत्ता दहावीत बोर्ड परीक्षेमध्ये इंटरमिजिएट परीक्षेत A ग्रेड मिळाल्यास एकूण गुणांमध्ये ८ गुण वाढीव मिळतात , “बी” ग्रेड मिळाल्यास एकूण गुणांमध्ये ५ गुण वाढीव मिळतात तर “सी” ग्रेड मिळाल्यास एकूण गुणांमध्ये ३ गुण वाढीव मिळतात.
सध्या या परीक्षेसाठी कलेची आवड असणारे काही प्रौढ व्यक्ती सुध्धा या परीक्षा देण्यासाठी आग्रही असल्याचे दिसून येते.
विद्यार्थ्यांमध्ये कलेविषयी आस्था निर्माण करणे तसेच कलेसंबंधी विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती निर्माण करणे हा या परीक्षांचा मुख्य उद्देश होय.
तसेच पालकांनी देखील विद्यार्थ्यांना केवळ या चित्रकलेच्या परीक्षा म्हणून नव्हे तर विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी व विद्यार्थ्यांमधील कलागुण ओळखून त्या जोपासण्यासाठी जास्तीत जास्त संख्येत प्रोत्साहित करणे आवश्यक आहे .
कला , तंत्रज्ञान तसेच इतर क्षेत्रात देखील या परीक्षा मोलाची भूमिका बजावतील यात शंका नाही.
लेखक – श्री.शैलेश लक्ष्मीकांत कुलकर्णी ,पाचोरा जिल्हा. जळगाव
संपर्क – ८४४६९३२८४९
(लेखक स्वतः कलाशिक्षक असून रांगोळीकार म्हणून प्रख्यात आहेत. व कलाछंद आर्ट क्लासेस च्या माध्यमातून विद्यार्थ्यांना कलेचे प्रशिक्षण देत असतात )