<
जळगाव-(जिमाका) – केंद्र शासनाच्या महिला व बालविकास विभागामार्फत बाल शक्ती पुरस्कार व बालकल्याण पुरस्कार दिला जातो. या पुरस्कारांसाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत 31 ऑगस्ट, 2019 पर्यंत होती. ती आता 30 सप्टेंबर, 2019 पर्यंत वाढविण्यात आली आहे. अशी माहिती सहाय्यक आयुक्त (बालविकास) महिला व बाल विकास आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, पुणे यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.
बाल शक्ती पुरस्कारासाठी 5 पेक्षा अधिक व 18 वर्षा पर्यंतच्या वय असलेल्या ज्या मुलांनी शिक्षण, कला, सांस्कृतिक कार्य, खेळ, नाविन्यपूर्ण शोध, सामाजिक कार्य व शौर्य अशा क्षेत्रात विशेष नैपुण्यपूर्ण कामगिरी केलेली आहे, त्यांना हा पुरस्कार दिला जातो.
बाल कल्याण पुरस्कार वैयक्तिक पुररस्कार- मुलांचा विकास, सरंक्षण व कल्याण या क्षेत्रात कोणत्याही प्रकारचे वेतन अथवा मानधन न घेता मानसेवी उदात्त भावनेतून किमान 7 वर्षे काम करणाऱ्या व्यक्तिस हा पुरस्कार दिला जातो.
संस्था स्तरावर- बालकल्याण क्षेत्रात अपवादात्मक कार्य करणाऱ्या संस्थेला हा पुरस्कार दिला जातो. संस्था पूर्णत: शासनाच्या निधीवर अवलंबून नसावी. बालकल्याण क्षेत्रात किमान 10 वर्ष सातत्यपूर्ण उत्कृष्ठ कार्य करणारी असावी.
बाल शक्ती व बाल कल्याण पुरस्कार-2019 करिता केंद्र शासनाने अर्ज मागविलेले आहेत. या पुरस्कारासाठीचे अर्ज हे www.nca-wcd.nic.in ह्या संकेतस्थळामार्फत ऑनलाईन पध्दतीने स्वीकारले जाणार आहेत. या पुरस्कारांची माहिती सदरच्या संकेतस्थळावर देण्यात आलेली आहे. तरी इच्छूकांनी 30 सप्टेंबर, 2019 पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन विजयसिंग परदेशी, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी, जळगाव यांनी केले आहे.