<
एकीकडे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मोठा दणका देत आदिवासी विभागाचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिनेशकुमार बागूल यांना २८ लाख रुपयाची लाच घेताना अटक केल्याचा प्रकार नुकताच घडला असता तोवर आता लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने जीएसटीच्या अधिक्षकाला अटक केली आहे. वींद्र चव्हाणके असे या लाचखोर अधिकाऱ्याचे नाव असून २४ तासात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दोन मोठ्या अधिकाऱ्यांना ताब्यात घेतल्याने खळबळ उडाली आहे.
नाशिकमध्ये असलेले राज्याचे आदिवासी विकास आयुक्तालयाच्या बांधकाम विभागात कार्यरत बागुल यांनी एका ठेकेदाराकडे अडीच कोटीचे काम मंजुर करण्यासाठी १२टक्के इतक्या दराने लाचेची मागणी केली होती. यानुसार ठेकेदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे धाव घेत तक्रार दिली. त्यांनतर सापाला रचून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने त्यांना अटक केली होती. काल रात्रीपासून ही कारवाई सुरु असल्याची माहिती आहे. बागुल यांच्याकडे कोट्यवधी रुपयांची मालमत्ता सापडेल असे सांगण्यात येते आहे. या कारवाईतील पैशांचा एक फोटोही हाती लागला आहे.
नाशकात जीएसटी अधिकाऱ्यालाही अटक
तर दुसरीकडे सीबीआयच्या लाच लुचपत विभागाने दुसरी एक कारवाई केली आहे. त्यात रवींद्र चव्हाणके या उच्च अधिकाऱ्याला अटक करण्यात आली आहे. चव्हाणके हे जीएसटी कर विभागाचे अधीक्षक आहेत. त्यांना नाशिकच्या सिडको कार्यालयातून अटक करण्यात आलेली आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यात अनेक ठिकाणी भ्रष्टाचाऱ्यांविरोधात मोठ कारवाई सुरु असल्याचे पाहायला मिळते आहे.