<
शिक्षणक्रांती तर्फे आयोजित Google Meet बैठकीत मार्गदर्शन
महाराष्ट्रातील सर्व महाविद्यालयात व विद्यापीठात गेल्या दोन दशकांपासून जन्माला आलेली CHB आज नेट, सेट आणि पीएचडी, POST DOC पात्रता धारकांच्या मानगुटीवर बसली असून पात्रताधारकांना जीवन जगण्यास अवघड ठरली आहे. वर्षभर तासिकेवर काम करून सुद्धा वेळेवर मानधन मिळत नाही, १० – १५ वर्ष CHB करून त्या अनुभवला कुणीही विचारत नाही; CHB धारकाला सेवा संरक्षण नसल्यामुळे कोणत्याही क्षणी CHB धारकाला सेवेतून काढले जाऊ शकते; भविष्याच्या भितीमुळे सर्व CHB धारक गप-गुमान पद्धतीने आज पर्यंत ज्ञान दान करत आले आहेत.
महाराष्ट्र शासनाच्या सहाय्यक प्राध्यापक भरतीच्या उदासीन धोरणामुळे हजारो CHB धारकांची स्वप्नं उद्धवस्त झालीत, कित्येकांनी आपले जीवन यात्रा संपवली. याबाबत शासन दरबारी शेकडो-हजारो निवेदने दिली, भेटी आणि बैठका झाल्या पण कुठलेही प्रश्न निकाली निघण्याचा वेग काही वाढला नाही; सरते शेवटी पर्यायी मार्ग म्हणून दिनांक २८ ऑगस्ट २०२२ रोजी सायंकाळी ०६.३० ते ८.३० वा. दरम्यान “CHB धारकांसाठी न्यायलयीन लढा एक खात्रीशीर संघर्ष “या विषयांवर ॲड. सिद्धार्थ इंगळे अधिवक्ता, मुंबई, उच्च न्यायालय व संस्थापक अध्यक्ष महाराष्ट्र स्टुडंट्स युनियन (मासु) यांचा मार्गदर्शनपर संवाद गुगल मिट वर डिजिटल पद्धतीने आयोजित केला.
नानाविध पद्धतीने CHB धारकांचे शोषण करणे, हे कायदेशीर कार्यवाहीस पात्र आहे; तसेच निद्रिस्त शासनाला जागे करण्यासाठी न्याय व्यवस्थेचा दरवाजा ठोठवला तरच CHB वरील अन्याय दूर होऊन पूर्णवेळ सहाय्यक प्राध्यापक भरती प्रक्रिया सुरळीत सुरु होऊ शकते आणि न्यायलयीन प्रक्रियेत यश मिळेपर्यंत मी स्वतः तुमच्या सोबत आहे; असे बोलतांना ॲड. सिद्धार्थ इंगळे यांनी सांगितले. या चर्चेत संपूर्ण महाराष्ट्रातून १५० – १६० CHB धारकांनी सहभाग नोंदविला. कित्येक CHB धारकांनी प्रश्न-उत्तराच्या वेळात शंका, अडचणी, मार्ग, अनुभव आणि शाश्वती बाबत ॲड. इंगळे यांना विचारले, त्यावर सकारात्मक आणि नकारात्मक भूमिका सांगून न्यायलयीन लढ्यातून काय मिळू शकते? हे स्पष्ट केले.
शिक्षणक्रांती च्या माध्यमातून आयोजित डिजिटल बैठकीत CHB धारकांचे प्रश्न आणि समस्या प्रास्ताविकात राज्य समन्वयक प्रा. नितिन घोपे यांनी मांडल्या. बैठकीचे सूत्रसंचालन प्रा. प्रमोद लेंडे खैरगावकर यांनी केले तर तांत्रिक नियोजनासह आभार प्रदर्शन शिक्षणक्रांतीचे राज्य समन्वयक डॉ. विवेक कोरडे यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी संपूर्ण महाराष्ट्रातून नेट, सेट, पीएचडी आणि POST DOC पात्रता धारकांनी उपस्थित राहून केले.