<
सुरेश भटांच्या गझल रंगात रसिक रंगले
जळगांव(प्रतिनीधी)- परिवर्तन अभिवाचन महोत्सवाच्या पाचव्या पर्वाचे उद्घाटन मोठ्या थाटात संपन्न झाले. याप्रसंगी आ. राजूमामा भोळे ग स बँकेचे चेअरमन मनोज पाटील, इंजि. प्रकाश पाटील मुजे महाविद्यालयाचे सांस्कृतिक प्रमुख श. दि. वडोदकर, शिरीष बर्वे, महोत्सवाचे प्रमुख विनोद पाटील हे मंचावर उपस्थित होते . याप्रसंगी परिवर्तन ही सातत्याने सांस्कृतिक उपक्रम करणारी संस्था एवढीच मर्यादित राहिली नसून आता जळगाव शहराची ओळख सांस्कृतिक महोत्सव करणारे गाव म्हणून महाराष्ट्राला परिवर्तनमुळे झाली आहे. असा सूर सर्वच मान्यवरांनी काढला. महोत्सवाचे प्रास्ताविक विनोद पाटील यांनी केले तर सूत्रसंचालन हर्षल पाटील यांनी केले तर नारायण बाविस्कर यांनी आभार व्यक्त केले. यानंतर लगेच सुरेश भट यांच्या रंग माझा वेगळा या कार्यक्रमाची सुरुवात झाली. गाणी, कविता, गझल आणि याला साजन आशय संपन्न व सर्वांगसुंदर असे निवेदन यामुळे या कार्यक्रमात रसिक तल्लीन होऊन समरस झाले. ‘लाभले भाग्य बोलतो मराठी’ या गाण्याने कार्यक्रमाची सुरुवात झाली आणि यानंतर ‘चांदण्यात फिरताना भीमराया’, ‘घे तुझी तुझेच धम्मचक्र फिरे जगावरी’, ‘सुन्या सुन्या मैफिलीत माझ्या’, ‘आज गोकुळात रंग’, ‘मेंदीच्या पानावर’, ‘उषःकाल होता होता’ या गीतांनी संपूर्ण सभागृह थक्क होऊन परिवर्तनाच्या कलावंतांना दाद देत होतो. यानंतर गझल तिच्यावर वैशिष्ट उर्दूचा असलेला प्रभाव, सुरेश भटांनी मराठीत चांगली गझल सुरेश भटांच्या उर्दू आणि मराठी गझलांचा एक सुंदर अनुभव या कार्यक्रमात रसिकांना अनुभवता आला. ‘मालवून टाक दीप तरुण आहे रात्र अजूनही’, ‘इतकेच मला जाताना’ यासोबत ‘खिचडी भात दिल-ए-नादाँ तुझे हुआ क्या है’ यांच्यासोबत गाली मिर आणि अनेक उर्दू शाहिरांचे अनेक शेर रसिकांवर बरसत राहिले आणिक सर्वांगसुंदर अनुभव या कार्यक्रमाने दिला. श्रद्धा पुराणिक, सुदिप्ता सरकार, हर्षदा कोल्हटकर, अक्षय गजभिये तर गायन व वाचन यामधून मंजुषा भिडे, अंजली पाटील आणि सोनाली पाटील या कलावंतांनी गाणी व कविता समरसून सादर केल्या. शंभू पाटील यांचे निवेदन बहारदार होते. या कार्यक्रमाची संकल्पना कवी अशोक कोतवाल, मंजूषा भिडे यांचे दिग्दर्शन तर निर्मिती मनीषा बाविस्कर यांची होती… परिवर्तन चा अभिवाचन महोत्सव महत्त्वाचा का याची चुणूक पहिल्याच दिवशी दिसली आणि पुढील सात दिवसाची उत्सुकता या पहिल्या कार्यक्रमाने वाढवली. महोत्सवासाठी राजू मामा भोळे, आर्यन पार्क, इंजिनियर असोसिएशन यांचा सहकार्य लाभले आहे. उद्या रविवारी शंभू पाटील लिखित व दिग्दर्शित ‘गांधी नाकारायचा आहे’ याचे अभिवाचन होणार आहे. वेळ ६.३० वाजता आहे.