<
जळगाव दि. १५ प्रतिनिधी – गांधी रिसर्च फाऊंडेशनच्यावतीने महात्मा गांधी जयंती व भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षांच्या निमित्ताने दि. २ ऑक्टोबर २०२२ रोजी जळगाव शहरस्तरावरील ‘गांधीतीर्थ प्रश्नमंजुषा-२०२२’ चे आयोजन करण्यात आले आहे. गांधी विचार व भारतीय स्वातंत्र्याच्या सामान्य ज्ञानावर आधारित ही स्पर्धा आहे. चार वेगवेगळ्या फेऱ्यांमधून होणाऱ्या या स्पर्धेची सुरुवात दि. २५ सप्टेंबरच्या प्राथमिक फेरीने होईल व रविवार, दि. २ ऑक्टोबर रोजी अंतिम मौखिक फेरी होईल. प्रथम तीन संघांना अनुक्रमे रु. ५०००/-, रु. ३०००/- व रु. २०००/- ची रोख पारितोषिके व प्रशस्तिपत्रके देऊन गौरविण्यात येईल.
स्पर्धेत सहभागी होण्यासाठी एका शाळेतून जास्तीत जास्त पाच विद्यार्थ्यांची नोंदणी करण्यात येईल. या नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांची दि. २५ सप्टेंबर रोजी ३० मिनिटांची ४५ प्रश्नांची लेखी परीक्षा घेण्यात येईल. ही परीक्षा वस्तुनिष्ठ (ऑब्जेक्टिव्ह) स्वरूपाची असेल. अनुभूती इंग्लिश मिडीअम स्कूल सेकंडरी, मू. जे. महाविद्यालयाजवळ होणाऱ्या या लेखी परीक्षेत बरोबर उत्तराला दोन गुण देण्यात येईल तर चुकीच्या उत्तराला -१ गुण देण्यात येईल. पहिल्या चाचणी फेरीतून ४० विद्यार्थ्यांची पुढील फेरीसाठी निवड करण्यात येईल. एका शाळेतील जास्तीत जास्त दोन विद्यार्थ्यांचा यात समावेश असेल. दुसरी व तिसरी फेरी मौखिक (ओरल) स्वरूपाची असेल. या दोनही फेऱ्या १ ऑक्टोबर रोजी कांताई सभागृहात होतील. यात विविध विषयांच्या अनुषंगाने प्रत्येकी ६ राऊंड घेण्यात येईल. अंतिम फेरी २ ऑक्टोबर रोजी ५ राऊंडची असेल व यातील रॅपिड फायर राऊंड हा निगेटिव्ह मार्किंगचा असेल. स्पर्धेत सहभागी सर्व विद्यार्थ्यांना सहभाग प्रमाणपत्र देण्यात येईल.
सहभागी होऊ इच्छिणाऱ्या शाळांनी आपल्या शाळेतील इ. ८ वी ते १० वीच्या वर्गातील जास्तीत जास्त ५ विद्यार्थ्यांची नोंदणी दि. २३ सप्टेंबरपूर्वी करावी. अधिक माहिती व नोंदणीसाठी स्पर्धा संयोजक गिरीश कुळकर्णी यांचेशी ९८२३३३४०८४ किंवा चंद्रशेखर पाटील ९४०४९५५२२० या क्रमांकावर संपर्क करावा.