<
ए मेरे वतन के लोगो, ये देश है वीर जवानों का, ए वतन ए वतन जानेजॉं जानेमन, ए वतन मेरे आबाद रहे तू, देस रंगिला रंगिला अशा एकाहून एक सरस गीतांनी विद्यार्थी गायकांनी उपस्थित रसिकांचे मनोरंजन केले. भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, विद्यार्थी विकास विभाग व सौ. रजनीताई नानासाहेब देशमुख कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, विद्यार्थी विकास विभाग
यांच्या संयुक्त विद्यमाने आंतरमहाविद्यालयीन देशभक्तीपर
गीतगायन स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत विविध महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीतांंच्या माध्यमातून आपली कला सादर केली व उपस्थितांची वाहवा मिळवली.
स्पर्धेचे उद्घाटक व अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एन. एन. गायकवाड उपस्थित होते. प्रमुख पाहुणे म्हणून राणी लक्ष्मीबाई महाविद्यालय, पारोळा येथील विद्यार्थी विकास अधिकारी डॉ. संभाजी सावंत, आप्पासाहेब र.भा. गरुड महाविद्यालय, शेंदुर्णी येथील विद्यार्थी विकास अधिकारी डॉ. योगिता चौधरी व श्री शेठ मु. मा. महाविद्यालय, पाचोरा येथील विद्यार्थी विकास अधिकारी डॉ. श्रावण तडवी उपस्थित होते.
या गीतगायन स्पर्धेत श्री शेठ मुरलीधरजी मानसिंगका महाविद्यालय, पाचोरा येथील विद्यार्थी राज शांताराम खैरनार याने ३०७५ रूपयांचे प्रथम पारितोषिक पटकावले. आप्पासाहेब र.भा. गरुड महाविद्यालय, शेंदुर्णी येथील विद्यार्थिनी कु. सेजल रवींद्र बोरकर हिने २०७५ रूपयांचे द्वितीय पारितोषिक प्राप्त केले तर राणी लक्ष्मीबाई महाविद्यालय, पारोळा येथील विद्यार्थिनी पूजा प्रकाश रोकडे हिने तिसरा क्रमांक प्राप्त करून १५७५ रू. मिळविले. स्पर्धेचे परीक्षक म्हणून संगीत शिक्षक लक्ष्मण खैरनार व कल्पेश सांगवीकर यांनी काम पाहिले.
याप्रसंगी प्राचार्य डॉ. एन. गायकवाड यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यार्थी विकास अधिकारी डॉ. दीपक मराठे यांनी केले. सूत्रसंचालन स्पर्धा समन्वयक प्रा. एस. एम. झाल्टे व डॉ. एस.डी. भैसे यांनी केले तर डॉ. एन. व्ही. चिमणकर यांनी उपस्थितांचे आभार मानले.