<
पाळीव प्राण्यांमुळे निर्माण झाला होता जीवाला धोका
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, रुग्णालय येथील वैद्यकीय पथकाचे यश
जळगाव (प्रतिनिधी) : तुमच्या घरात पाळीव प्राणी आहेत काय ? तर मग स्वतः:चीदेखील काळजी नक्कीच घ्या…कारण, एका रुग्ण महिलेला पाळीव प्राण्यापासून पोट दुखण्याचा गंभीर आजार जडला आणि शस्त्रक्रिया करून तिच्या पोटातून ८०० ग्रामचा मोठा गोळा काढण्यात येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील वैद्यकीय पथकाला यश आले. त्यामुळे महिलेला मोठे जीवदान मिळाले. सदर महिलेस अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांच्या उपस्थितीत रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला.
भुसावळ येथील रशिदाबी गवळी या ४७ वर्षीय महिलेस पोट दुखणे, अन्न पचन न होणे, उलटी मळमळ होणे, पोट फुगणे असे त्रास होत होते. तिची संपूर्ण वैद्यकीय तपासणी करून शल्यचिकित्सा विभागाने शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला. अत्यंत अवघड शस्त्रक्रिया, रक्तस्राव होण्याचा धोका, रुग्णाचा जीव धोक्यात असूनही वैद्यकीय कौशल्य पणाला लावत शल्यचिकित्सा विभागाने यशस्वी शस्त्रक्रिया केली.
महिलेस लिव्हरचा त्रास होता. लिव्हरच्या डाव्या बाजूस ८०० ग्रामचा मोठा गोळा दिसून आला. तो शस्त्रक्रियेवेळी काढण्यात आला. हा लिव्हरचा आजार इचायनोकोकोस या जंतूमुळे होतो. यामुळे हा लिव्हरचा जंतुसंसर्ग आजार मनुष्याला होतो. हा आजार पाळीव प्राण्यांच्या माध्यमातून मानवी शरीराला होण्याची शक्यता असते. त्यामुळे काळजी घेतली पाहिजे, अशी माहिती सहयोगी प्राध्यापिका डॉ. संगीता गावित यांनी दिली.
शस्त्रक्रियेनंतर महिला रुग्ण बरी झाली. त्यामुळे त्यांना रुग्णालयातून अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांच्या उपस्थितीत निरोप देण्यात आला. रुग्णावर उपचार करण्याकामी डॉ. मारोती पोटे, डॉ. संगीता गावित, डॉ. रोहन पाटील, डॉ. महेंद्र मल, डॉ. सागर कुरकुरे, डॉ. विपीन खडसे, डॉ. सुनील गुट्टे यांच्यासह बधिरीकरण विभागाचे प्रमुख डॉ. संदीप पटेल, डॉ. अनिल पाटील, डॉ. ऋतुराज काकड, परिचारिका निला जोशी, सुरेखा महाजन व सहकार्यांनी परिश्रम घेतले.