<
पाचोरा – (प्रतिनिधी) – तालुका सहकारी शिक्षण संस्था संचलित सौ. रजनीताई नानासाहेब देशमुख कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना स्थापना दिन साजरा करण्यात आला. महात्मा गांधी यांच्या संकल्पनेतून राष्ट्रीय सेवा योजनेची स्थापना झाली. त्यामुळे महात्मा गांधी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. याप्रसंगी विद्यार्थ्यांनी श्रमदान करून हा दिवस साजरा केला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एन. एन. गायकवाड होते. वक्ते म्हणून अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे समन्वयक डॉ. ए. एन. भंगाळे उपस्थित होते.
त्यांनी यावेळी विद्यार्थ्यांना राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्थापनेमागील महात्मा गांधी यांची भूमिका पटवून दिली. त्याचप्रमाणे राष्ट्रीय सेवा योजनेमध्ये काम करणाऱ्या विद्यार्थी स्वयंसेवकांची कर्तव्ये व जबाबदाऱ्या यांच्यासंबंधी मार्गदर्शन केले. प्राचार्य डॉ. एन. एन. गायकवाड यांनी अध्यक्षीय मनोगतात राष्ट्रीय सेवा योजनेचे महत्त्व विशद केले. यावेळी डॉ. एस. डी. भैसे, डॉ. एस. जी. शेलार, डॉ. सी. एस. पाटील यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ. एन. व्ही. चिमणकर यांनी केले तर सहाय्यक कार्यक्रम अधिकारी प्रा. डी. ए. मस्की यांनी उपस्थितांचे आभार मानले.