<
जळगाव – (प्रतिनिधी) – माहितीचा अधिकार अधिनियमानुसार विविध शासकीय कार्यालयांमध्ये नागरीक माहिती विचारत असतात . काही कार्यालयांमध्ये नागरिकांना वेळेवर माहिती मिळत नाही व माहिती देण्यास टाळाटाळ केली जाते , जणू काही माहिती विचारणारा आपला वैरीच आहे अशा पद्धतीने जनमाहिती अधिकारी वागतात . त्यामुळेच माहिती अधिकार कार्यकर्ते व जनमाहिती अधिकारी , शासकीय अधिकारी यांच्यात मतभेद व वाद होत असतात . एकंदर जनमाहिती अधिकारी व माहिती अधिकार कार्यकर्ते यांच्यात सख्य नसल्याचे चित्र बघायला मिळते . याउलट काही कार्यालयांमध्ये जनमाहिती अधिकारी विचारण्यात आलेली माहिती नागरीकांना कायद्यानुसार उपलब्ध करून देतात व नागरिकांशी सौजन्याने वागतात . काही कर्तव्यदक्ष व तत्परतेने माहिती उपलब्ध करुन देणाऱ्या अधिकाऱ्यांचा माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाच्या कार्यकर्त्यांना प्रत्यक्ष अनुभव आलेला आहे . अशाच काही जनमाहिती अधिकाऱ्यांचा आज जागतिक माहिती अधिकार दिनाचे औचित्य साधुन माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाच्यावतीने सन्मानचिन्ह , पुष्पगुच्छ व माहिती अधिकार पुस्तिका देऊन सत्कार करण्यात आला .
सत्कार करण्यात आलेल्या जनमाहिती अधिकाऱ्यांमध्ये जिल्हा नियोजन विभागाचे श्री. सु. रा. बाविस्कर , सार्वजनिक बांधकाम विभागाचे श्री. संजय पाटिल , उपविभागीय अधिकारी कार्यालयातील श्रीमती प्राजक्ता केदार , जिल्हा सामान्य रुग्णालय जळगाव येथील श्री. रवींद्र अमृतकर यांचा समावेश आहे . तसेच शासन परिपत्रकानुसार माहिती अधिकार दिन साजरा करण्याचे उत्तमरीत्या नियोजन करून सदर कायद्याविषयी जनजागृती केल्याबद्दल जळगाव शहर महानगरपालिकेच्या आयुक्त श्रीमती डॉ. विद्या गायकवाड यांचा देखील सत्कार करण्यात आला . याप्रसंगी माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाचे जिल्हा उपाध्यक्ष अमोल कोल्हे , जिल्हा संघटक शैलेश सपकाळे , नरेंद्र सपकाळे , प्रचारक चंद्रकांत श्रावणे , दुर्वास कोळी , चंद्रशेखर कोळी , सामाजिक कार्यकर्ते दिनेश भोळे , भीमराव सपकाळे , किरण ठाकूर आदि उपस्थित होते .