<
दिपक सपकाळे(मुख्य संपादक) – शासन यंत्रणेतील व्यवहारात पारदर्शकता यावी, भ्रष्टाचाराचे समूळ निर्मूलन व्हावे, प्रशासकीय कार्यपद्धती, नियम व इतर शासकीय कामांमध्ये गैरव्यवहारास वाव राहू नये, यासाठी जीवाची पर्वा न करता जनतेच्या हितासाठी माहिती अधिकार कार्यकर्ते अहोरात्र झटत असतात. माहिती मिळवत असतांना माहिती अधिकार कार्यकर्त्यांना भ्रष्टाचारी महाशय यांच्याकडून बऱ्याच धमक्या येत असतांना अनेक वेळा प्राणघातक हल्ला, तसेच खून झाल्याच्या बातम्या आपणास मीडियाच्या माध्यमातून मिळत असतात.
अशाच प्रकारची एक घटना गुजरात येथे घडली होती. २० जुलै २०१० रोजी गुजरात हायकोर्टाच्या समोर माहिती अधिकार कार्यकर्ते अमित जेठवा यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. या हत्ये प्रकरणी जुनागड येथील भाजपचे माजी.खासदार दीनू बोघा सोलंकी याच्यासह ७ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र गुजरात पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण विभागाने या प्रकरणात दीनू बोघा सोलंकी यांना क्लीन चिट दिली होती. मात्र अमित जेठवा यांच्या वडिलांनी लढा सुरु ठेवून त्यांनी या प्रकरणात हायकोर्टात याचिका दाखल केली होती. याचिका दाखल झाल्यानंतर हायकोर्टाने या प्रकरणाचा तपास योग्य व्हावा म्हणून प्रकरणाचा तपास सीबीआय कडे सोपवला होता. सीबीआयने योग्य तपास केला असता, सीबीआयच्या तपासात या सातही जणांना दोषी ठरवण्यात आल्यानंतर आज अखेर त्यांना अमित जेठवा हत्या प्रकरणात शिक्षा ठोठावण्यात आली आहे. माहिती अधिकार कार्यकर्ते अमित जेठवा यांना न्याय मिळाल्याने इतर माहिती अधिकार कार्यकर्ते यांचे देखील समाधान झाले आहे.