<
जळगांव – (प्रतिनिधी) – महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय विभागाच्या वतीने संपुर्ण महाराष्ट्रात 26 नोव्हेंबर 2022 ते 06 डिसेंबर 2022 पर्यंत सामाजिक पर्व साजरा करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. आज दिनांक 26 नोव्हेंबर 2022 रोजी समाज कल्याण विभाग जळगाव येथील सामाजिक न्याय भवन येथे संविधान गौरव दिनाचे औचित्य साधून सहाय्यक आयुक्त समाज कल्याण विभाग जळगाव यांच्या वतीने संविधान प्रास्ताविकेचे वाचन आणि संविधानावर तज्ञ व्यक्तीकडून मार्गदर्शनाचा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. दिनांक 26 नोव्हेंबर ते 06 डिसेंबर 2022 पर्यंत सामाजिक पर्व साजरा करण्यात येणार आहे. त्या अनुषंगाने सहाय्यक आयुक्त समाज कल्याण विभाग जळगाव यांच्या वतीने डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे आणि संविधान प्रास्ताविकेचे पूजन करण्यात आले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला कास्ट्राईब कर्मचारी संघटना महासंघ जळगावचे जिल्हाध्यक्ष श्री रवींद्र तायडे यांनी आपल्या मनोगतातून भारतीय संविधान आणि हक्क यासंदर्भात विवेचन केले. संविधान तज्ञ मार्गदर्शक म्हणून लोकसेवक मधुकरराव चौधरी समाजकार्य महाविद्यालयातील वरिष्ठ प्राध्यापक डॉ. शाम सोनवणे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. जगातील सर्वात मोठी लिखित व आदर्श नियमावली म्हणुन भारतीय संविधानाकडे पाहिले जाते. भारतीय संविधानाची वैशिष्ट्ये, पार्श्वभूमी आणि संविधान सभे समोर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी केलेल्या भाषणाच्या आठवणींना उजाळा दिला. तसेच घटना समिती, मसुदा समिती आणि संविधान सभा यांच्या 2 वर्ष 11 महिने 18 दिवसात 166 बैठका घेऊन विचारांती भारतीय संविधानाची निर्मिती झालेली आहे असे सांगितले. लोकशाहीचा मुख्य आधारस्तंभ म्हणून भारतीय संविधानाकडे पाहिले जाते, असे मत डॉ. सोनवणे यांनी व्यक्त केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री योगेश पाटील सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण विभाग, जळगाव. हे होते. त्यांनी आपल्या मनोगतातून भारतीय संविधानाने दिलेल्या मूलभूत अधिकार आणि कर्तव्य यांचे सर्वांनी पालन केले पाहिजे आणि घराघरात संविधानासंदर्भात प्रसार आणि प्रचार करून संविधानाची गणीमा कायम राखली पाहिजे असे आवाहन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक कार्यालयीन अधीक्षक श्री कांबळे साहेब यांनी केले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन लेखाधिकारी पाटील मॅडम यांनी केले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जितेंद्र धनगर यांनी केले.