<
अमळनेर – (प्रतिनिधी) – पं. ज. ने. समाजकार्य महाविद्यालय अमळनेर येथे संविधान गौरव दिनानिमित्त प्रास्ताविकेचे वाचन आणि दिनांक 26 नोव्हेंबर 2022 ते 6 डिसेंबर 2022 या दरम्यान सामाजिक पर्व साजरा करण्याबाबत सामाजिक न्याय विभाग जळगाव यांच्या समन्वयातून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेले आहे. आज संविधान गौरव दिनाचे औचित्य साधून सामाजिक पर्व या कार्यक्रमाचे उद्घाटन संपन्न झाले. कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान श्रम साफल्य एज्युकेशन संस्था अमळनेर चे अध्यक्ष श्री सुभाष दादा भांडारकर होते.
संविधान तज्ञ प्रमुख वक्ते म्हणून गटशिक्षणाधिकारी श्री अशोक बिऱ्हाडे साहेब तर कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून माजी पोलीस निरीक्षक श्री बैसाणे साहेब हजर होते. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी एस पाटील, सामाजिक पर्व कार्यक्रम समन्वयक प्रा. विजय वाघमारे, राष्ट्रीय सेवा योजनेचे विभागीय समन्वयक प्रा. डॉ. जगदीश सोनवणे, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा.डॉ. अस्मिता सरवैया हे व्यासपीठावर विराजमान होते.
मान्यवरांच्या हस्ते भारतीय संविधान उद्देश पत्रिका आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. अस्मिता सरवैया यांनी केले. संविधान गौरव दिनानिमित्त प्रा. डॉ. जगदीश सोनवणे यांनी उद्देश पत्रिकेचे सामूहिक वाचन करून संविधाना प्रती कटीबद्ध राहण्याची प्रतिज्ञा घेण्यात आली.
महाविद्यालयातील विद्यार्थी दिलीप पावरा, सायली महाले, दीपक विश्वेश्वर, तेली फाईक, अन्वर फकीर या विद्यार्थ्यांनी संविधान गौरव दिनानिमित्त मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते श्री अशोक बिऱ्हाडे साहेबांनी संविधान निर्मिती करण्यासाठी त्यावेळी असलेल्या आव्हानांवर चर्चा केली. तत्कालीन व्यवस्थेने बाबासाहेबांकडे असलेल्या सकारात्मक आणि दूरदृष्टीचा विचार करून त्यांच्यावर मसुदा समितीच्या अध्यक्षपदाची जबाबदारी सोपवली. घटना समिती आणि इतर अन्य समित्यांनी केलेले कार्य आणि मसुदा समितीने केलेल्या कार्य हे अतिशय मुद्देसूद व सर्व समावेशक असल्याचे मत साहेबांनी व्यक्त केलं. सेवानिवृत्त पोलीस निरीक्षक श्री बैसाणे साहेबांनी विद्यार्थ्यांना संविधान गौरव दिनाच्या शुभेच्छा दिल्या. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी एस पाटील यांनी सामाजिक पर्व या कार्यक्रमांतर्गत घेण्यात येणाऱ्या विविध कार्यक्रमांची माहिती उपस्थितांना करून दिली. प्राध्यापक विजय वाघमारे यांनी आपल्या मनोगत यातून विद्यार्थ्यांना विद्यार्थी जीवनातच अभ्यासाची आवड निर्माण व्हावी म्हणून ग्रंथालयात विविध पुस्तकांची आणि संविधानाच्या प्रति उपलब्ध असल्याची माहिती देऊन वाचनाची सवय लावावी असे आव्हान केले. संविधान गौरव दिनानिमित्त मनोगत व्यक्त करताना डॉ. पाटील म्हणाले की, देशातील प्रत्येक व्यक्तीच्या कल्याणासाठी, हक्कांसाठी, सर्व समावेशक विकासाकरिता आणि लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी संविधान अतिशय महत्त्वाचे आहे. कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि श्रम साफल्य एज्युकेशन संस्थेचे अध्यक्ष श्री सुभाष दादा भांडारकर यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतातून सांगितले की भारतीय संविधान हे जगातील सर्वोत्कृष्ट असे संविधान आहे, आपल्या देशाचा राष्ट्रीय ग्रंथ असून, देशातील प्रत्येक नागरिकांनी या ग्रंथाचे वाचन करून आत्मसात करणे गरजेचे आहे. संविधानाच्या माध्यमातून सर्व जाती-धर्माचे वंशाचे अधिकार आणि हक्क अबाधित ठेवून कर्तव्याचे देखील जाणीव करून दिलेली आहे. सदर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून महाविद्यालयातील प्रा.डी आर ढगे, प्रा डॉ भरत खंडागळे, प्रा डॉ एस आर चव्हाण, प्रा डॉ श्वेता वैद्य, प्रा डॉ अनिता खेडकर, प्रा. चंद्रशेखर बोरसे, महाविद्यालयातील शिक्षकेतर कर्मचारी, राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक, विद्यार्थी, माजी विद्यार्थी, बहुसंख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ. अस्मिता सरवैया यांनी केली. राष्ट्रीय सेवा योजनेचा स्वयंसेवक दीपक विश्वेश्वर यांनी आभार व्यक्त केले.