<
जळगाव-(प्रतिनिधी) – खरा तो एकची धर्म, जगाला प्रेम अर्पावे आहे हे साने गुरुजींच्या जीवनाचे सार होते.पायाला घाण लागू नये म्हणून जसा जपतोस, तसे मनाला घाण लागू नये म्हणून जप.
साने गुरुजींनी आईच्या या उपदेशाचे आयुष्यभर अगदी तंतोतंत पालन केले. गुरुजींनी आपल्या यशाचे ,संस्कारांचे श्रेय आईला दिले. साने गुरुजींचा आदर्श विद्यार्थ्यांनी डोळ्यासमोर ठेवावा. 1936 मध्ये झालेले फैजपूर येथील काँग्रेसचे अधिवेशन यशस्वी करण्यासाठी साने गुरुजी यांनी मोलाचे योगदान दिले. त्या अधिवेशनाच्या दिवसाचे वृत्तपत्र मी आजही जपून ठेवले आहे असे प्रतिपादन बोदवड येथील एन.एच .रांका महाविद्यालयाचे प्राध्यापक, प्रेरणादायी व्याख्याते डॉ. विश्वजीत सिसोदे यांनी उद्घाटन प्रसंगी केले.
भगीरथ इंग्लिश स्कूलमध्ये साने गुरुजी कथामाला उद्घाटन सोहळा नुकताच संपन्न झाला. या प्रसंगी साने गुरुजींच्या जीवनातील विविध प्रसंग डॉ.सिसोदे त्यांनी डोळ्यासमोर उभे केले. सर्व विद्यार्थी मंत्रमुग्ध होऊन ऐकत होते. भगीरथ शाळेत पन्नास वर्षापासून अखंपणे साने गुरुजी कथामाला हा उपक्रम राबवण्यात येत आहे, याबद्दल त्यांनी प्रशंसा केली.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला डॉ.विश्वजीत सिसोदे यांच्या शुभहस्ते व मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत दीपप्रज्वलन व साने गुरुजींच्या प्रतिमेला माल्यार्पण करून साने गुरुजी कथामालेचे उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी प्रमुख अतिथी डॉ. सिसोदे यांचा शाळेच्या मुख्याध्यापिका तथा कार्यक्रमाच्या अध्यक्षा सौ. सीमा वैजापूरकर यांच्या हस्ते शाल, श्रीफळ व बुके देऊन स्वागत सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक साने गुरुजी कथामाला समितीचे प्रमुख आर. डी. कोळी यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कथामाला सदस्या अलका पितृभक्त यांनी केले.याप्रसंगी उपमुख्याध्यापिका प्रिया सफळे, पर्यवेक्षक एस.पी.निकम, गजानन नानुटे,कथमाला समिती सदस्य अशोक पारधे, किरण पाटील, सुनील तायडे तसेच शाळेतील सर्व शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी एस.डी भिरुड, संगीता पाटील,नरेश फेगडे, राजू क्षीरसागर यांनी सहकार्य केले. कार्यक्रमाच्या शेवटी कथामाला समिती सदस्या पल्लवी ठोके यांनी आभार प्रदर्शन केले.