<
जळगांव(प्रतिनीधी)- पाचव्या परिवर्तन अभिवाचन महोत्सवात आज विरेंद्र पाटील लिखित व दिग्दर्शित ‘झेंडूची फुले’ ह्या साहित्य कृतीचे अभिवाचन करण्यात आले. सदर कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून दिलीप जोशी, सुचिता पाटील तसेच नाट्यकर्मी-समीक्षक विजय पाठक होते.ग्रामीण भागातील शेती करणाऱ्या समूहाला आर्थिक संकट तर आहेच, शेतकऱ्यांच्या आत्महत्या हे शेतीच्या ऱ्हासाचे लक्षण आहे. पण आर्थिकच कारण याला जबाबदार नाहीतर सामाजिक दृष्ट्या देखील शेतीला प्रतिष्ठा नाही. त्यामुळे शेती करणाऱ्या तरुण मुलांची लग्न हा गंभीर प्रश्न आहे. जळगाव जिल्ह्यातील कृषी संस्कृतीत काम करणाऱ्या तरुणांना अगदी बाहेरून आदिवासी समाजातील मुली लग्नासाठी आणाव्या लागतात.कारण शेतीत कामकरणाऱ्या मुलाला शेतकरी सुद्धा मुली देत नाहीत. लग्नाळू मुलगा तुषार जोशी याने हुबेहूब उभा केला. मुकुंद महाजन, अजय पाटील, रितेश वानखेडे व भारती वैष्णव यांनी समरस होऊन अभिवाचन केले. विरेंद्र पाटील आणि संजीवनी यांच्या लेवागण बोलीतील, वऱ्हाडी बोलीतील हलक्या फुलक्या विनोदांनी रसिकांना खळखळून हसवले, खिळवून ठेवले.आज अभिवाचनाला प्रेक्षकांचा खूप प्रतिसाद होता. जागेअभावी अनेकांना परत जावं लागलं. आजच्या अभिवाचनाची प्रकाश योजना नितीश पाटील तर संगीत मानसी पाटील यांनी केले व कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हे मनोज पाटील यांनी केले. महोत्सव स्थळी निर्माण करण्यात आलेला अभिवाचनाचा सेल्फी फॉइन्ट प्रेक्षकांच आकर्षणाचं केंद्र बनला आहे. अभिवाचन महोत्सवाला राजू मामा भोळे, आर्यन पार्क व इंजिनियर असोसिएशनचे सहकार्य लाभले आहे. उद्या मुंबई येथील श्रीनिवास नार्वेकर दिग्दर्शित ‘पंतप्रधानास पत्र’ ह्या साहित्य कृतीचे अभिवाचन केले जाणार आहे, उपस्थितीचे आव्हान परिवर्तनतर्फे करण्यात आले आहे.