<
जामनेर – (प्रतिनिधी) – जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. तुषार देशमुख व जिल्हा माता बालसंगोपन अधिकारी डॉ. मनीषा बांगर यांच्या मार्गदर्शनाखाली जामनेर तालुक्यात विशेष गोवर- रुबेला लसीकरण मोहिमेस सुरुवात करण्यात आली.
या मोहिमेत एकूण 26345 नऊ महिने ते पाच वर्षे बालकांचे सर्वेक्षण व तपासणी करण्यात आली पैकी नऊ महिने ते दोन वर्षे वयाची 11980 बालके आढळून आली. यामध्ये पहिल्या डोसचे 32 बालके व दुसऱ्या डोस चे 46 बालके वंचित आढळून आले 8 बालके संशयित आढळून आल्याने त्यांचे रक्त तपासणीसाठी जिल्हास्तरावरून अहमदाबाद येथे पाठवण्यात आले.
वंचित राहिलेल्या बालकांसाठी 15 विशेष लसीकरण सत्रांचे आयोजन करण्यात आले.
महिनाअखेर पर्यत सर्व वंचित बालकांचे लसीकरण पूर्ण करण्यात येणार आहे.
महाराष्ट्र राज्यात सध्या बऱ्याच ठिकाणी गोवर रुबेला उद्रेक होत आहे.गोवर हा विषाणूजन्य तीव्र सांसर्गिक आजार असल्याने हा कुपोषित बालके व दाटीवाटीने राहणाऱ्या वस्तीत जास्त प्रमाणात होतो.या आजारापासून आपल्या बालकांना दूर ठेवण्यासाठी बालकांचे नियमित लसीकरण केल्यास गोवर रुबेला आजार टाळला जाऊ शकतो तसेच गोवर झाल्यास बालकांना ‘अ’ जीवनसत्त्व डॉक्टरांच्या सल्ल्याने द्यावे,गोवर झालेल्या बालकाला इतरांपासून विलग ठेवावे,गोवर साथीच्या रुग्णाच्या संपर्कात जाणे टाळावे,वारंवार साबणाने हात स्वच्छ धुवावेत,रुग्णाने विश्रांत घेऊन हलका आहार घ्यावा,पिवळी फळे हिरव्या पालेभाज्या खाव्यात.तसेच सर्वेक्षणाच्या वेळी अनुपस्तीत असलेल्या आपल्या पाच वर्षापर्यंत च्या बालकांचे काही कारणास्तव गोवर लसीकरण राहिलेले असल्यास जवळच्या शासकीय दवाखान्यात संपर्क साधावा तसेच खाजगी डॉक्टरांकडे गोवर चे संशयित रुग्ण आढळून आल्यास प्रतिबंधात्मक उपाययोजनांसाठी याची माहिती तात्काळ आरोग्य विभागास कळवावी असे आवाहन आरोग्य विभागाच्या वतीने तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.राजेश सोनवणे यांच्याकडून करण्यात आले.