<
प्रथम अपील अधिकारी यांच्या आदेशाला जनमाहिती अधिकारी दाखवताय केराची टोपली….?
जळगाव – (प्रतिनिधी) – येथील सार्वजनिक बांधकाम उपविभाग क्र. १ चे जनमाहिती अधिकारी हे माहितीचा अधिकार अधिनियम – २००५ अन्वये मागणी केलेल्या अर्जाची माहितीच देत नसल्याने अर्जदार चांगलेच त्रस्त झालेले आहेत.
सविस्तर वृत्त असे की, जळगाव येथील शिवाजी नगर उड्डाण पुल बाबत माहितीची मागणी जळगाव येथील ॲड. दिपक सपकाळे यांनी दिनांक ३०/०९/२०२२ रोजी सार्वजनिक बांधकाम विभाग जळगाव यांच्याकडे माहितीचा अधिकार अधिनियम २००५ अन्वये अर्ज दाखल केला होता परंतु सदर माहिती ही सार्वजनिक बांधकाम उपविभाग क्र १ यांच्या कार्यालयाशी संबधित असल्याने मुळ अर्ज माहितीचा अधिकार अधिनियम २००५ कलम ६ अन्वये मुदतीत दिनांक ०३/१०/२०२२ रोजी वर्ग करण्यात आला होता.
माहितीचा अधिकार अधिनियम – २००५ अन्वये ३० दिवसात माहिती देणे बंधनकारक असतांना देखील माहिती न मिळाल्याने अर्जदार यांनी कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग जळगाव यांच्याकडे दिनांक ०२ /११/२०२२ रोजी प्रथम अपील अर्ज दाखल केला होता.
त्यावर दिनांक २२/११ /२०२२ रोजी सुनावणी घेण्यात आली होती व सदर सुनावणीमधे जनमाहिती अधिकारी यांना आदेशीत करण्यात आले होते की, अर्जदार यांना मुळ अर्जातील माहिती विनामूल्य ७ दिवसांच्या आत देण्यात यावी असे आदेश देण्यात आले आहेत. परंतु अद्यापही संबधित जनमाहिती अधिकारी यांनी माहिती दिलेली नाही. सदर माहितीत नेमक काय दडलय हा मात्र संशोधनाचा विषय आहे.
अर्जदार यांनी माहिती मिळाली नसल्याने राज्य माहिती आयुक्त नाशिक खंडपीठ यांच्या कडे द्वितीय अपिल दाखल केले आहे.
आपण एकीकडे बघतो प्रशासकीय यंत्रणा पारदर्शकतेच्या गप्पा झोडते परंतु खऱ्या अर्थाने अजुन ही या विभागांमधे माहिती अधिकार कायद्या विषयी अनास्था आहे हे मात्र यावरुन लक्षात येते.