<
जळगांव – आपल्या एका ट्विट च्या माध्यमातून मुस्लीम समाजाच्या श्रध्देला ठेच पोहचविणा-या व धार्मिक भावना दुखविणा-या आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा या मागणीचा तक्रार अर्ज नुकताच भाजपा अल्पसंख्यांक मोर्चा, जळगांव महानगर तर्फे जळगांव शहर पोलीस स्टेशन येथे देण्यात आला आहे. याप्रसंगी भाजपा अल्पसंख्यांक मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष ॲड. शहेबाज शेख, महानगर जिल्हाध्यक्ष गुड्डू पठाण, सरचिटणीस मोहंमद नुर शेख, उपाध्यक्ष अफसर शेख, आसिफ शेख आदींची उपस्थिती होती.
यावेळी देण्यात आलेल्या तक्रार आर्जाचा आशय असा की, दि. ०३/०१/२०२३ रोजी भारतीच जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष मा. जे. पी. नड्डा, प्रदेशाध्यक्ष मा. चंद्रशेखर बावनकुळे यांनी चंद्रपुर दौ-यावर असतांना, चंद्रपुर मधील सुप्रसिध्द मुस्लीम समाजाचे श्रध्दास्थान सुफी संत सय्यद बहेबतूल्लाह शाह यांचे दर्ग्यावर भेट दिली. यावेळी सदर मान्यवरांच्या हस्ते दर्ग्यावर फुलांची चादर अर्पण करण्यात / चढविण्यात आली.
या बाबतचे वृत्त प्रसारमाध्यमात प्रसिध्द झाल्यानंतर राष्ट्रवादी पक्षाचे नेते तथा आ. जितेंद्र आव्हाड यांनी आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरून“ औरंगजेबजीच्या कबरीवर फुले वाहतांना बाबनकुळेजी” या आशयाखाली सदरचा फोटो प्रसिध्द करून, मुस्लीम समाजातील अनेकांच्या श्रध्देला व आस्थेला ठेच पोहचविली आहे. तसेच त्यांच्या या कृत्यामुळे भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या सामजिक प्रतिमेस धक्का लागून, सदरच्या खोटया ट्विटमुळे हिंदू-मुस्लीम बांधवांमध्ये संभ्रमाची स्थिती निर्माण झाली आहे.
त्यामुळे मुस्लीम समाजाला अपानित करणा-या तसेच मुस्लीम सुफी संतांना बदनाम करणा-या आ.जितेंद्र आव्हाड यांचा भाजपा अल्पसंख्याक मोर्चा जळगांव जिल्हा तर्फे जाहीर निषेध करण्यात येत आहे. तसेच त्यांच्यावर भादवि कलम २९५ (क), ५०१ तसेच माहिती व तंत्रज्ञान कायदयाखाली गुन्हा दाखल करून त्यांना त्वरीत अटक करण्याची मागणी करण्यात आली आहे.