<
ठाणे – (न्यूज नेटवर्क) – सध्या प्रेम प्रकरणातून घातपात झाल्याचा घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे अश्यातच प्रेयसीला फिरण्याच्या बहाण्याने कसाऱ्याच्या जंगलात नेऊन धारदार शस्त्रांनी संपवल्याची धक्कादायक आणि शहारे आणणारी घटना समोर आलीये. ठाणे जिल्ह्यातील कसाराच्या जंगलात तरुणीचा मृतदेह सापडल्यानंतर पोलिसांनी 24 तासांत तपासाची चक्र फिरवून आरोपींचा छडा लावला आणि बेड्या ठोकल्या.
मुंबईला लागून असलेल्या ठाणे जिल्ह्यातील कसाराच्या जंगलात 5 जानेवारी रोजी 20 ते 25 वयाच्या तरुणीचा मृतदेह आढळून आला होता. या तरुणीची धारदार शस्त्राने हत्या करण्यात आल्याचं प्रथमदर्शनी पोलिसांना आढळून आलं. हत्या केल्यानंतर मृतदेह जंगलात फेकण्यात आला होता.
तरुणीची लिव्ह इन पार्टनरकडून हत्या… पोलिसांनी आरोपींना कसं शोधलं?
कसाऱ्याच्या जंगलात मृतदेह सापडलेल्या तरुणीजवळ पोलिसांना मोबाईल मिळाला. हा फोन मृत तरुणीचाच होता. मोबाईल लॉक होता. त्यामुळे पोलिसांनी सायबर तज्ज्ञांची मदत घेतली. 5 जानेवारी रोजीच मोबाईलचा लॉक उघडण्यात यश आलं. त्यामुळे पोलिसांना तरुणीची ओळख पटवण्यात मदत झाली.
तरुणीची ओळख पटल्यानंतर पोलिसांनी मुंबई-नाशिक-आग्रा महामार्गावरील सीसीटीव्ही फूटेज तपासले. त्यात मृत तरुणी मोटारसायकलवरून दोन तरुणांसोबत जाताना दिसली. त्यानंतर पोलिसांनी 4 शोध पथक तयार केली.
सीसीटीव्ही फुटेज आणि मोबाईलवर असलेल्या कॉल डिटेल्स, लोकेशनच्या आधारावर पोलीस आरोपींपर्यंत पोहोचले. पोलिसांच्या एका टीमने भिवंडीत जाऊन आरोपी रिझवान आणि त्याचा मित्र अर्शदला अटक केली.
तरुणीची हत्या का केली ? आरोपी रिझवानने पोलीस चौकशीत काय सांगितलं?
आरोपींना अटक केल्यानंतर पोलिसांनी त्यांची चौकशी केली. त्यात आरोपींनी घटनेबद्दलची माहिती दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी रिझवान हा मृत तरुणीसोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होता. मागील वर्षभरापासून दोघं भिवंडीत राहत होते.
गेल्या काही महिन्यांपासून दोघांमध्ये वेगवेगळ्या कारणांवरून भांडणं होत होते. त्यामुळे रिझवानने रिलेशनशिपमधून सुटका करून घेण्यासाठी त्याने मित्र अर्शदसोबत कट रचला.
रिझवानने मयत तरुणीला फिरण्यासाठी जायचं आहे म्हणून बोलावून घेतलं आणि तिला कसाराच्या जंगलात घेऊन गेले. तिथे गेल्यानंतर तरुणीवर धारदार शस्त्राने वार केले. त्यामुळे तरुणी जागेवरच मरण पावली. यावेळी तरुणीजवळ मोबाईल होता, मात्र आरोपींचं लक्ष मोबाईलकडे गेलंच नाही. मात्र, मोबाईलने पोलिसांना आरोपींचा शोध घेण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.