<
जळगाव दि.15 प्रतनिधी – दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्र नागपूर (सांस्कृतिक मंत्रालय, भारत सरकार) व स्व. वसंतराव चांदोरकर स्मृती प्रतिष्ठानच्या संयुक्त विद्यमाने आयोजित २१ व्या बालगंधर्व संगीत महोत्सवाची प्रातःकालीन सभा गुलाबी थंडीच्या पार्श्वभूमीवर व मकर संक्रांतीच्या मुहूर्तावर महात्मा गांधी उद्यानाच्या निसर्गरम्य वातावरणात संपन्न झाली. ऐन गुलाबी थंडीत हा स्वरवर्षाव तमाम जळगावकर रसिकांना सुखावून गेला.
प्रतिष्ठानच्या परंपरेनुसार सुरुवातीला गुरुवंदना मयूर पाटील यांनी सादर केली. दीपप्रज्वलन जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी श्री. अमन मित्तल यांच्यासह कलावंत ओंकार प्रभू घाटे व संपदा माने यांच्याहस्ते झाले. या संगीत सभेच्या निमित्ताने जिल्हाधिकारी अमन मित्तल यांचे स्वागत प्रतिष्ठानचे कार्यकारी विश्वस्त दीपक चांदोरकर यांनी पुष्पगुच्छ व स्मृतिचिन्ह देऊन केले. कलावंत ओमकार प्रभू घाटे यांचा सत्कार जिल्हाधिक्कारी अमन मित्तल यांनी केला. तर संपदा माने यांचा प्रतिष्ठानच्या उपाध्यक्षा दीपिका चांदोरकर, रामकृष्ण करंबेळकर यांचा दीपक चांदोरकर, वरद सोहनी यांचा प्रतिष्ठानचे सचिव अरविंद देशपांडे, गणेश मेस्त्री यांचा मेजर नानासाहेब वाणी तर सुसंवादिनी अनुश्री फडणीस-देशपांडे चे स्वागत दीपिका चांदोरकर यांनी केले.
खानदेशच्या सांस्कृतिक मानदंडाचा स्वराभिषेक अर्थात एकविसावं आवर्तन स्वराभिषेकाचं.. या कार्यक्रमात ओंकार आणि संपदा यांनी अनेक गाजलेली नाट्यगीत व अभंग सादर केलेत. यामध्ये प्रामुख्याने ‘ब्रह्ममूर्ती मंत्र’, ‘श्रीरंगा कमला कांता’, ‘निराकार ओंकार’, ‘सोहम हर डमरू बाजे’, ‘देवाघरचे ज्ञात कुणाला’, ‘निर्गुणाचा संग’, ‘जोहार मायबाप जोहार’ ही नाट्यपदं ओमकार व संपदा यांनी दमदारपणे सादर करून रसिकांना या गुलाबी थंडीत आसनांवर खेळवून ठेवलं.
त्याचबरोबर ‘बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल’, ‘पांडुरंगी नामी’, या अभंगांनी मैफिल भक्तीरसात चिंब भिजू लागली. ओंकार ने ‘ध्यान लागले रामाचे’, ‘संत भार पंढरीत’, ‘अवघे गरजे पंढरपुर चालला नामाचा गजर’, ‘इंद्रायणी काठी देहाची आळंदी’ हे अभंग सादर करून रसिकांना वाहवा मिळवून त्यांना भक्ती रसाच्या स्वरवर्षावात तृप्त केले. त्याला उपज अंगाने तितकीच दमदार साथ संगत रामकृष्ण करंबेळकर (तबला) गणेश मेस्त्री (पखावज) यांनी केली संवादिनीवर वरद सोहनी यांची बोटे लिळ्या फिरत होती. वरद ने संगत केली. तालवाद्यावर धनंजय कंधारकर यांनी आपलं महत्त्व अधोरेखित केलं. या संपूर्ण कार्यक्रमाला एका सूत्रात गुंफण्याचं महत्त्वपूर्ण कार्य सुसंवादीनी अनुश्री फडणीस-देशपांडे यांनी उत्तमरित्या केलं ‘अग वैकुंठीचे राया’ या भैरवीने २१ व्या बालगंधर्व संगीत महोत्सवाच्या स्वरोत्सवाची प्रातःकालीन संगीत मैफल झाली. आभार दीपक चांदोरकर यांनी मानले. या प्रातःकालीन सभेच्या यशस्वीतेसाठी प्रतिष्ठानचे सर्व विश्वस्त वरुण देशपांडे, मयूर पाटील, अरविंद देशपांडे, दीपिका चांदोरकर, जुईली कलभंडे, आशिष मांडे, अनघा गोडबोले, शोभा निळे यांनी परिश्रम घेतले.