<
जळगाव – (प्रतिनिधी) – जिल्हाभरातील प्राथमिक शाळामधील विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता वाढण्यासाठी शिक्ष्कांसोबातच पालकांचा सहभाग देखील खूप मोठा असल्याचा विश्वास जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी व्यक्त केला .
बुधवार दि. १८ जानेवारी रोजी निपुण भारत अंतर्गत शैक्षणिक गुणवत्ता या विषयावर आयोजित फेसबुक संवाद कार्यक्रमात ते बोलत होते. या ऑनलाईन कार्यक्रमाला प्राथमिक शिक्षणधिकारी विकास पाटील , माध्यमिक शिक्षणाधिकारी नितीन बच्छाव उपस्थित होते. या वेळी मार्गदर्शन करतांना डॉ. पंकज आशिया म्हणाले कि, जळगाव जिल्ह्यात निपुण भारत अंतर्गत शैक्षणिक गुणवत्ता वाढीचे काम मोठ्या प्रमाणात सुरु आहे. शाळांचा दर्जा सुधारावा व विद्यार्थ्यांना उत्कृष्ट शिक्षण मिळावे या साठी जिल्हाभरात १६ कलमी कार्यक्रम राबविला जात आहे.
बाला उपक्रमांतर्गत जिल्ह्यातील ३२ शाळामध्ये विविध कामे पूर्ण करण्यात आलेली आहेत. त्याचबरोबर इतर शाळामध्ये कामे सुरु आहेत. शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी पालक आणि शिक्षकांचा मोठा सहभाग असतो त्यामुळे आगामी काळात यावर विशेष भर देण्याच्या सूचना देखील डॉ.आशिया यांनी दिल्या. भाषा आणि गणिताचे ज्ञान वाढविणे गरजेचे आहे. स्थानिक पातळीवर या साठी प्रयत्न होणे गरजेचे आहे. त्या साठी निपुण चाचणीची गुणवत्ता वाढविणे देखील गरजेचे आहे. शाळामधील विद्यार्थ्यांची उपस्थिती वाढणे महत्वाचे आहे. शाळामधील विद्यार्थ्यांची उपस्थिती वाढण्यासाठी पालकांशी संपर्क करणे, ग्रामपंचायतीला विविध शालेय उपक्रमात सहभागी करून घेणे गरजेचे आहे. शिक्षकांना प्रशिक्षणाची गरज आहेच मात्र आपले शिक्षक सक्षम आहेत. शिक्षकांनी या बाबी मनावर घेऊन या कामासाठी पुढाकार घेतल्यास नक्कीच बदल घडू शकतो असा विश्वास देखील मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी व्यक्त केला. वर्गात शिक्षण घेत असलेल्या शेवटच्या १० विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढीकडे शिक्षकानी लक्ष दिल्यास नक्कीच बदल घडू शकतो . या साठी यंत्रणेने पाच मुद्यांवर भर देणे गरजेचे असल्याचेही डॉ. पंकज आशिया यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिक्षणाधिकारी श्री विकास पाटील यांनी केले.प्रास्ताविकात त्यांनी सदर कार्यक्रमाची आवश्यकता व उद्देश स्पष्ट केला. या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी उप शिक्षणाधिकारी श्री राजेन्द्र सपकाळे,शिक्षण विस्तार अधिकारी विजय पवार , तंत्रस्नेही शिक्षक प्रभात तडवी ,तांत्रिक विभागाचे राजू चव्हाण , प्रशांत होले यांनी परिश्रम घेतले.