<
तृतीयपंथीयांनी शासकीय योजनांच्या माध्यमातून सक्षम व्हावे – शमिभा पाटील यांचे प्रतिपादन
जळगांव-(प्रतिनिधी) – जिल्ह्यातील तृतीयपंथीयांना केंद्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या माध्यमातून (https://transgender.dosje.gov.in) या वेबसाईटवर नाव नोंदणी करून ओळखपत्र व प्रमाणपत्र प्राप्त करून घेणे यासोबतच सहायक आयुक्त समाज कल्याण, जळगाव श्री. योगेश पाटील यांचे मार्गदर्शनाखाली आयोजित एकदिवशीय शिबिरात विविध शासकीय कल्याणकारी योजनांचा (उदा. आभा कार्ड, संजय गांधी निराधार योजना, घरकुल योजना,व्यवसायाभिमुख योजना, शैक्षणिक योजना) इ. लाभ व्हावा व याबाबत माहिती उपलब्ध व्हावी याकरिता दि. १४/०३/२०२३ रोजी डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, जळगांव येथे घेण्यात आले. सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक वरिष्ठ समाज कल्याण निरीक्षक आर.डी.पवार यांनी केले असून सदर प्रास्ताविकात जिल्हास्तरीय तृतीयपंथी कल्याण मंडळ यांचे मार्फत जिल्हाभरातील तृतीयपंथीयांना विविध शासकीय कल्याणकारी योजनांचा लाभ मिळणेकरिता आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करून घेणेबाबत आवाहन केले.
यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित श्रीमती. शामिभा ताई पाटील सदस्य, विभागीय तृतीयपंथीय कल्याण मंडळ, नाशिक यांनी आपले मत व्यक्त करतांना शासन व प्रशासन तृतीयपंथीयांसाठी काम करत आहे त्याप्रमाणे तृतीयपंथी समुदायातील व्यक्तींनी देखील यामध्ये सहभाग नोंदवावा असे आवाहन केले.मुक्त विद्यापीठात मोफत शिक्षण उपलब्ध करून द्वावे तसेच घरकुल योजना, संजय गांधी निराधार योजना, अन्तोदय योजना, शेळी पालन बाबत प्रशिक्षण याविषयी सखोल मार्गदर्शन करतांना जीवन जगण्याचा दृष्टीकोन व अपेक्षा विषयी तृतीयपंथीयांना देखील इतर माणसांप्रमाणे जीवन जगण्याचे अधिकार आहेत असे मत व्यक्त केले. वाय.आर.जी.केअर सेंटर चे लोजीस्तिक सहायक पियुष चौधरी यांनी त्यांच्या संस्थेमार्फत तृतीयपंथीयांसाठी केल्या जाणाऱ्या कामकाजाविषयी माहिती दिली.
यावेळी जिल्हाभरातून एकूण २७ तृतीयपंथी व्यक्ती उपस्थित असून त्यापैकी ७ तृतीयपंथीय व्यक्तींना आभा कार्ड वाटप करण्यात आले.
सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तालुका समन्वयक अनिल पगारे यांनी केले तर उपस्थितांचे आभार तालुका समन्वयक किशोर माळी यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्री. अरुण वाणी, तालुका समन्वयक महेंद्र डी.पाटील, श्रीमती शिला अडकमोल, चेतन चौधरी, जितेंद्र धनगर, धनराज पाटील आदींनी प्रयत्न केले. यावेळी विविध योजनांच्या लाभासाठी आवश्यक उदा. आधार कार्ड, मतदान कार्ड , नावात बदल केला असेल तर शासनाचे गझेट व एफीडेव्हीट, कोविड-१९ ची घेतल्याचे प्रमाणपत्र, बँक खाते बुक, जातीचा दाखला, PAN कार्ड, शैक्षणिक गुणवत्ता प्रमाणपत्र इ. सादर करून जिल्ह्यातील जास्तीत जास्त तृतीयपंथीयांनी आपली नोंदणी करावी तसेच अडचणी आल्यास सहायक आयुक्त समाजकल्याण कार्यालय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, मायादेवी मंदिर समोर महाबळ रोड, जळगाव येथे संपर्क (०२५७-२२६३३२८-२९) करावा असे आवाहन देखील करण्यात आले.