<
जळगाव – (प्रतिनिधी) – बी.जे. मार्केट समोरील जुनी बौद्ध वसाहतीत १९८३ पासून उभा असलेला तथागत गौतम बुद्ध आणि विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा अतिशय अयोग्य पद्धतीने हटविण्याचा प्रयत्न जळगाव पोलीस प्रशासनाने केल्यासंदर्भात संपूर्ण बहुजन समाजाच्या भावना अत्यंत संतप्त आहेत. समाजकंटक प्रशांत शरद देशपांडे सारखी व्यक्ती पुतळा अनधिकृत असल्याची तक्रार करते आणि त्यावर प्रशासन मध्यरात्रीच्या वेळी अयोग्य पद्धतीने कार्यवाही करते ही घटनाच मुळी हादरवून सोडणारी आहे. या घटनेचा तीव्र निषेध नोंदविण्यासाठी व याप्रकरणी दोषी असणाऱ्या व्यक्तींवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी तथागत गौतम बुद्ध व डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा संरक्षण समितीच्या माध्यमातून समस्त बहुजन समाजाच्या वतीने सर्वपक्षीय तसेच आंबेडकरी विचारांच्या संघटनांचा निषेध मोर्चा मंगळवार दि.२१ मार्च २०२३ रोजी सकाळी ठीक ११:०० वाजता जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात येणार आहे.
हा मोर्चा बी.जे.मार्केट समोरील जुनी बौद्ध वसाहत येथून पुष्पलता बेंडाळे चौक, चित्रा चौक,छत्रपती शिवाजी महाराज पुतळा येथून बस स्टँड ते स्वातंत्र्य चौक मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार आहे. सदर मोर्च्यात संपूर्ण जिल्ह्यामधून हजारोच्या संख्येत शिव- फुले- शाहू- आंबेडकरप्रेमी बहुजन समाज सहभागी होणार आहे. मोर्चात प्रचंड संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन तथागत गौतम बुध्द व डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा संरक्षण समितीच्यावतीने केलेले आहे.