छत्रपतीसंभाजीनगर -(प्रतिनिधी) – देशातील सर्वात मोठे ‘महापशुधन एक्सपो २०२३ ‘ शिर्डीच्या शेती महामंडळाच्या ४६ एकर विस्तीर्ण जागेत भरणार असून देशभरातील पाच हजारांपेक्षा जास्त पशु-जनावरे या प्रदर्शनास असणार आहेत. ५०० हून अधिक स्टॉल या प्रदर्शनात लावण्यात येणार आहेत. शेतकरी, पशुपालक, तरूणांसाठी हे महा एक्स्पो पर्वणी ठरणार आहे.
अशी माहिती जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी,डॉ.सुरेखा माने यांनी आज दिली. महापशुधन एक्स्पो ‘हा पशुसंवर्धन विषयातील नवनवीन तंत्रज्ञान आत्मसात करण्यासाठी आणि शास्त्रोक्त पध्दतीने पशु-पक्षी पालन करण्यासाठी शेतकरी, पशुपालक व युवकांसाठी दिशादर्शक व अत्यंत उपयुक्त ठरणार असल्यामुळे सर्व तरुण, पशुपालक शेतकरी यांनी आवर्जून भेट द्यावी असें आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना यांनी केले आहे.