
Rahul Gandhi Twitter Bio : राहुल गांधी यांनी खासदारकी रद्द झाल्यानंतर ट्विटरच्या बायोमध्ये बदल केला आहे. ट्विटरचा बायो बदलताना त्यांनी अनोखा उल्लेख करत भाजपला डिवचलं आहे.
नवी दिल्ली : काँग्रेस नेते राहुल गांधी यांची खासदारकी सूरत कोर्टाने मानहानीचा प्रकरणात दोषी ठरवल्यानंतर लोकसभा सचिवालयाकडून रद्द करण्यात आली होती. सूरत कोर्टाने राहुल गांधी यांना दोन वर्षाची शिक्षा सुनावल्यानंतर लोकसभा सचिवालयाने २४ मार्च रोजी राहुल गांधी यांची खासदारकी रद्द केली. राहुल गांधी यांनी काल पत्रकार परिषद घेत या सर्व प्रकरणाबाबत त्यांची भूमिका स्पष्ट केली. भाजप आदानींना वाचवण्याचा प्रयत्न का करतेय, अदानींच्या बेनामी कंपन्यांमध्ये वीस हजार कोटी रुपये कसे आले असा, सवाल राहुल गांधी यांनी केला. लोकसभा सचिवालयाने खासदारकी रद्द केल्यानंतर राहुल गांधी यांनी त्यांच्या ट्विटर बायो मध्ये बदल केला आहे. ‘डिक्वालिफाईड एमपी’ असा उल्लेख करत राहुल गांधी यांनी भाजपला डिवचण्याचा प्रयत्न केला आहे.
कर्नाटक मध्ये २०१९ मध्ये एका सभेत बोलताना राहुल गांधी यांनी मोदी या आडनावाबद्दल एक वक्तव्य केलं होतं. त्याबाबत गुजरातमधील भाजपचे माजी आमदार पूर्णेश मोदी यांनी गुन्हेगारी स्वरूपाचा मानहानीचा खटला दाखल केला होता. याप्रकरणी २३ मार्चला राहुल गांधी यांना सूरत कोर्टाने दोन वर्षांची शिक्षा सुनावली. त्याच्या दुसऱ्याच दिवशी लोकसभा सचिवालयाकडून राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करण्यात आल्यानंतर त्यांनी त्यांच्या ट्विटर बायो मध्ये निलंबित खासदार असा उल्लेख केला आहे.
राहुल गांधी यांची खासदारकी रद्द झाल्यानंतर काँग्रेस आक्रमक झालं आहे.पक्षाच्या वतीने आज देशभरात संकल्प सत्याग्रह आणि राजघाटावर एक दिवसीय सत्याग्रह करण्यात आला. काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांनी देशासाठी शहीद झालेल्या माझ्या वडिलांचा अपमान संसदेत करण्यात येतो. शहिदांच्या मुलाचा अपमान केला जातो. त्यांना मीर जाफर म्हटलं जातं. माझ्या आईचा अपमान केला जातो. तुमचे मंत्री त्यांना वडील कोण असा प्रश्न विचारतात. पंतप्रधान गांधी परिवाराला नेहरू आडनाव का लावत नाही असा सवाल करतात. यासाठी तुमच्यावर कसली ही केस होत नाही. तुमचं सदस्यत्वही रद्द होत नाही, अशी टीका प्रियांका गांधी यांनी केली.
प्रियांका गांधी यांनी हे सर्व राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेमुळे केलं जात असल्याचं म्हटलं. राहुल गांधी कुणासमोर झुकणार नाहीत आणि ते कोणाला घाबरत नाहीत, असं प्रियांका गांधी म्हणाल्या. निरव मोदी ओबीसी आहेत का? मेहुल चोक्सी ओबीसी आहे का? ललित मोदी ओबीसी आहे का असा सवाल प्रियांका गांधी यांनी केला.