<
राज्याच एकाच दिवसात ६९४ नवे रुग्ण
Coronavirus latest updates : राज्यात करोना संसर्गाचा धोका वाढत असून आज ६९४ नव्या करोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर आज एकूण १८४ बाधित बरे होऊन घरी गेले.
मुंबई : राज्यात करोनाचा धोका वाढू लागला असून आज एकाच दिवशी राज्यात ६९४ नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान आज एकूण १८४ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले. तसेच आज एकाही करोना बाधिताचा मृत्यू झालेला नाही.राज्यात आतापर्यंत एकूण ७९ लाख ९२ हजार २२९ करोनाचे रुग्ण बरे झाल्याची नोंद करण्यात आली आहे. हे पाहता राज्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९८.१४ टक्के इतके झाले आहे. तर राज्यात मृत्यूचा दर १.८२ टक्के इतका आहे.
आज राज्यात एकूण ३ हजार १६ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. राज्यात मुंबईत सर्वाधिक सक्रिय रुग्ण उपचार घेत आहेत. तर दुसऱ्या स्थानी ठाणे आणि तिसऱ्या स्थानी पुणे आहे.
देशात XBB. 1.16 व्हेरिएंटचा वाढता धोका
देशात XBB. 1.16 या व्हेरिएंटचा धोका दिवसेंदिवस वाढत चालला आहे. देशात XBB. 1.16 या व्हेरिएंटचा पहिला रुग्ण जानेवारी महिन्यात आढळला होता. देशात रुग्णवाढीचं कारण हा XBB. 1.16 व्हेरिएंट असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. INSACOG च्या माहितीनुसार, XBB. 1.16 या व्हेरिएंटचे सर्वात जास्त रुग्ण महाराष्ट्र आणि गुजरात राज्यात आहेत. महाराष्ट्राच XBB. 1.16 सर्वाधिक रुग्णांची नोंद पुण्यात झाली आहे. पुण्यात एकूण १५१ रुग्णांची नोंद झाली आहे. या व्हेरिएंटचा तुलनेने झपाट्याने प्रसार होत असल्यामुळे सरकारने सावधगिरी बाळगण्याचे आवाहन केले आहे.दरम्यान, काल राज्यात ४८३ नवे रुग्ण आढळले होते. राज्यात मुंबईनंतर पुणे, ठाणे, रायगड आणि नाशिक या जिल्ह्यांमध्ये सर्वाधिक सक्रिय रुग्णांची संख्या आहे. राज्यातील एकूण सक्रिय रुग्णांपैकी तब्बल ८० टक्के रुग्ण फक्त मुंबई, पुणे, ठाणे, रायगड आणि नाशिकमध्ये आहेत.
देशात कोरोनाची स्थिती
देशात सध्या कोरोनाचे १३ हजार ५०९ सक्रिय रुग्ण आहेत, अशी माहिती केंद्रीय आरोग्य आणि कुटुंबकल्याण मंत्रालयाने दिली आहे. तर आतापर्यंत एकूण ४ कोटी ४१ लाख ६८ हजार ३२१ रुग्णांना उपचारानंतर रुग्णालयातून घरी सोडण्यात आले. तर आतापर्यंत देशात ५ लाख ३० हजार ८६२ करोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे.