<
सरपंचाने पंचायत समितीसमोर २ लाख उधळले, नोटांचा पाऊस पाडला, कारण धक्कादायक
वेगवेगळ्या शासकीय योजनांअंतर्गत शेतकऱ्यांना विहिरीसाठी अनुदान दिले जाते. संभाजीनगर जिल्ह्यातील सर्वच तालुक्यात विविध योजनांसाठी शेतकरी वर्ग अर्ज करत आहे. अशात फुलंब्री तालुक्यात विहिरीसाठी अर्ज करणाऱ्या शेतकऱ्याकडे बीडीओने लाच मागितल्याचा आरोप तरुण सरपंचाने केला आहे.
March 31, 2023
औरंगाबाद : शासकीय योजनेतून शेतकऱ्यांना विहिरी घ्यायच्या होत्या, मात्र बी.डी.ओ व इतर अधिकारी त्यासाठी लाचेची मागणी करित असल्याचे कळताच संतप्त झालेल्या तरुण सरपंचाने पंचायत समितीसमोर नोटांचा पाऊस पाडला. यासाठी त्याने शक्कल लढवली. तरुण सरपंचाने शेतकऱ्याकडून प्रत्येकी १० हजार रुपये गोळा करुन त्याने ते पैसे पंचायत समितीसमोर उधळले. हा व्हिडीओ सध्या सगळीकडे व्हायरल होतोय.फुलंब्री तालुक्यातील गेवराई पायगा या गावातील कोरडवाहू शेतकऱ्यांना शासकीय योजनेतून विहिरी घ्यायच्या होत्या. मात्र त्यांना विहिरी मंजूर करण्यासाठी बी.डी.ओ व इतर अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांकडे लाच मागितली, असा आरोप सरपंच मंगेश साबळे यांनी केला. साबळे यांनी शेतकऱ्यांकडून १०-१० हजार गोळा केले अन् थेट फुलंब्रीचं पंचायत समिती ऑफिस गाठलं.जमा झालेले दोन लाख रुपये घेऊन, बंडलांचे हार करून त्यांनी ते गळ्यात घातले. सुमारे अर्धा तास सरपंचाचं आंदोलन सुरु होतं. बघ्यांची गर्दी वाढत होती. तेव्हा सरपंचाने बंडलामधल्या नोटा उधळल्या आणि पैशांचा पाऊस पाडला. तिथल्या संपूर्ण परिसरात नोटांचा खच पडला होता. तरुण सरपंचाचं आंदोलन पाहून उपस्थित लोकही चक्रावून गेले. थोडा वेळ त्यांनाही नेमकं काय चाललंय, कळेनासं झालं. मात्र नंतर त्यांना नेमकं प्रकरण समजलं.लोकप्रतिनिधी आपल्या मर्जीतील लोकांना विहिरी मंजूर करतात, असा आरोप अधिकाऱ्यांचीही टक्केवारी ठरलेली आहे, जर या प्रकरणी संबंधितांवर कारवाई झाली नाही तर लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालयासमोर आंदोलन करेन, असा इशाराही यावेळी तरुण सरपंचाने दिला.
गेवराई पैघा या गावचे सरपंच मंगेश साबळे यांनी सत्ताधाऱ्यांवर कडाडून टीका केली. सरकारने शेतकऱ्यांना मदतीचं आश्वासन दिलं, मात्र साधी विहीर मंजूर करण्यासाठी अधिकारी हजारोंची लाच मागत आहेत. शेतकऱ्यांनी इतके पैसे कुठून द्यावे, जर त्यांच्याकडे एवढे पैसे असते तर शासनाच्या योजनांसाठी त्यांनी अर्ज कशाला असता? असा सवाल विचारतच फुलंब्रीच्या पंचायत समिती कार्यालयाबाहेर साबळेंनी नोटांची उधळण केली.