<
तो सनातन धर्म आम्हाला मान्य नाही, खुलेआम सांगावे लागेल, संयोगिताराजेंच्या समर्थनार्थ जितेंद्र आव्हाडांची खमकी पोस्ट
सनातन्यांनी पुन्हा एकदा छत्रपतींच्याच घराण्याला शूद्र म्हणून हिणवण्याचे काम केले आहे.
संयोगिताराजेंबाबतीत तीच घटना घडली. या घटनेचा निषेध करण्यासाठी उद्या दुपारी ३ वाजता नाशिकच्या काळाराम मंदिरात एकत्र जमून लोकशाही पद्धतीने निषेध करुया, असं आवाहन जितेंद्र आव्हाड यांनी केलंय.
नाशिक : ज्या हिंदू धर्माने मला वसुधैव कुटुम्बकम म्हणून सर्व जाती-धर्मांचा आदर करायला शिकवले. मी त्या सर्वसमावेशक विचारांचा हिंदू आहे. पण, सनातनांच्या दृष्टीने मी शूद्र आहे आणि शूद्रांना कुठलेच अधिकार नाही, असं सनातन्यांचे म्हणणे आहे. तेच संयोगिताराजे यांच्याबद्दल घडलं. ज्या संविधानाच्या माध्यमातून बाबासाहेबांनी सनातन धर्म कायमचा खोडून टाकला. आज तो सनातन धर्म परत डोकं वर काढत आहे. आपल्याला त्याला विरोध करावाच लागेल. तो सनातन धर्म आम्हाला मान्य नाही खुलेआम सांगावे लागेल, असं राष्ट्रवादीचे नेते आमदार जितेंद्र आव्हाड म्हणालेत. त्यांनी संगोयिताराजे छत्रपती यांना पाठिंबा दर्शवणाऱ्या भावना व्यक्त करत भलीमोठी पोस्ट लिहिलीये.
नाशिकच्या काळाराम मंदिरातील तथाकथित महंतांनी माझ्या पूजेसाठी पुराणातील मंत्र म्हणण्याचा प्रयत्न केला. कोल्हापूरच्या छत्रपती घराण्याच्या वारशामुळे मी ठामपणे विरोध केला. पुजाऱ्याने वेदोक्त मंत्राऐवजी पुराणोक्त मंत्र म्हटले, असं सांगतानाच या प्रकारानंतर पुजाऱ्याला झापल्याचंही संयोगिताराजेंनी सांगितलं. संयोगिताराजेंना वेदोक्त मंत्र पठण नाकारल्यानंतर त्याचे पडसाद राजकीय वर्तुळातही उमटले आहेत. जितेंद्र आव्हाड यांनी संयोगिताराजेंच्या समर्थनार्थ पोस्ट लिहिली आहे.
जितेंद्र आव्हाड काय म्हणाले आहेत?
मी धर्माभिमानी हिंदू आहे. ज्या हिंदू धर्माने मला वसुधैव कुटुम्बकम म्हणून सर्व जाती-धर्मांचा आदर करायला शिकवले. मी त्या सर्वसमावेशक विचारांचा हिंदू आहे. पण, सनातनांच्या दृष्टीने मी शूद्र आहे आणि शुद्रांना कुठलेच अधिकार नाही असे सनातन्यांचे म्हणणे आहे. तेच काय संयोगिताराजे यांच्याबद्दल घडलं. ज्या लोकांनी पुराणोक्त-वेदोक्त प्रकरणी महाराष्ट्रावर ज्यांच्या विचारांचा पगडा आहे त्या छत्रपती शाहू महाराजांना देखील अशीच वाईट वागणूक दिली होती. सनातन्यांनी बुद्धांना त्रास दिला, सनातन्यांनी महावीर जैनांना त्रास दिला, सनातन्यांनी बसवेश्वर अण्णांना त्रास दिला, चक्रधर स्वामींना त्रास दिला, ज्ञानेश्वर माऊलींच्या आई-वडिलांना आत्महत्या करायला लावली, ज्ञानेश्वर माऊलींना त्रास दिला. सावता माळी, गोरा कुंभार, चोखामेळा, संत एकनाथ, संत नामदेव ह्यांना त्रास दिला. विद्रोह झाला आणि शीख धर्म स्थापन झाला तो ह्या सनातन्यांमुळेच. याच सनातन्यानी तुकाराम महाराजांना त्रास दिला, त्यांच्या पोथ्या फेकून दिल्या. या सनातन्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना राज्याभिषेक नाकारला. ह्या सनातन्यांनी कट करुन औरंगजेबाला मदत केली व संभाजी राजेंचा घात केला. त्यांच्या मृत्यूला जबाबदार ठरले.
महात्मा फुलेंनी या पुराणोक्त-वेदोक्त पद्धतीला विरोध करुन महिलांना शिकवलंच पाहिजे ही भूमिका घेऊन समाजाबाहेर पडले आणि स्वत:च्या पत्नीला शिकवलं. या दाम्पत्याचा खून करण्याचा कट सनातम्यांनी रचला. शाळा उघडण्याला विरोध केला. त्यांच्यावर शेणगोटे मारण्यात आले. पण, महात्मा फुलेंनी आपले काम पुढे चालूच ठेवले. पुरोगामी विचारांचा सर्वात मोठा आधार शाहू महाराज यांना तर अगदीच वाईट वागणूक दिली. पुराणोक्त-वेदोक्त प्रकरण हे इतिहासात गाजले. पण, त्यांच्याही खुनाचा कट ह्या सनातन्यांनी रचला होता.
पण, ह्या सनातन्यांना पुरुन उरले ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर. ज्यांनी मंदिर प्रवेशाचे आंदोलन केले. ज्यांनी मनुस्मृती जाळली. ज्यांनी महाड चवदार तळ्याचे आंदोलन केले आणि माणसाला माणूस म्हणून जगू द्या. माणूसकी हा धर्म आहे असे म्हणत संविधान लिहिले. आणि ज्या संविधानाच्या माध्यमातून त्यांनी सनातन धर्म कायमचा खोडून टाकला. आज तो सनातन धर्म परत डोकं वर काढत आहे. आपल्याला त्याला विरोध करावाच लागेल. ज्या धर्मामध्ये बहुजनांना स्थानच नाही. बहुजन शुद्र म्हणूनच ओळखले जातील. तो सनातन धर्म आम्हांला मान्य नाही असे खुलेआम सांगावे लागेल. ती वेळ आली आहे. कारण, त्यांनी परत एकदा छत्रपतींच्याच घराण्यामध्ये त्यांना शूद्र म्हणून हिणवण्याचे काम केले आहे. या देशाच्या घटनेत, बाबासाहेबांच्या संविधानावर विश्वास असणाऱ्या प्रत्येक नागरिकाने या घटनेचा निषेध करण्यासाठी उद्या काळाराम मंदिरात दुपारी 3.00 वाजता यावे. आपण सर्वजण मिळून संविधानिक मार्गाने या घटनेचा निषेध करुयात….