
Akola Crime : सोमवारी सायंकाळी सहा वाजताच्या सुमारास काटेपूर्णा शेत शिवारात वंचित बहुजन आघाडीचा पदाधिकारी नितीन मोहोड याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा आरोप आहे
April 4, 2023
अकोला : वंचित बहुजन आघाडीचा पदाधिकाऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना अकोल्यात समोर आली आहे. नितीन उर्फ लखन मोडोह (वय ३२, राहणार भिम नगर कुरणखेड, जि. अकोला) असं या पदाधिकाऱ्याचे नाव आहे. त्याच्याकडे सुसाईड नोट देखील सापडली असल्याची माहिती आहे. काही दिवसांपूर्वी नितीनला चार जणांनी मारहाण केली होती. त्यानंतर हे प्रकरण पोलिसात गेलं. दरम्यान मारहाण करणारे हे वाळू माफिया असल्याचे समजते. पोलीस तक्रारीनंतर त्यांच्याकडून वारंवार नितीनला धमक्या मिळत होत्या. परंतु पोलिसांकडून कोणतीही ठोस कारवाई संबंधित व्यक्तींवर न झाल्यामुळे नितीनने आत्महत्येसारखं टोकाचे पाऊल उचलल्याचे समजते. दरम्यान नितीनने सुसाईड नोटमधून पोलीस अधीक्षकांकडे दाद मागत कारवाईची अपेक्षा व्यक्त केली आहे. आता या प्रकरणात काल रात्री चार जणांविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले आहे.
काय आहे प्रकरण
नितीन उर्फ लखन भीमराव मोहड हे २८ मार्च रोजी रात्री ८ वाजता जुन्या वस्तीतून घराकडे जात होते. त्याचवेळी लाईट नसलेला रेती वाहून नेणारा ट्रॅक्टर त्यांच्या अंगावर आला. त्यावेळी नितीन हे थोडक्यात बचावले, यानंतर वाहन चालक अन् नितीनमध्ये हमरीतुमरी झाली. थोड्या वेळात नितीनने त्याच्या भावाला लागलीच पोलिसात तक्रार करण्यासाठी बोलावून घेतले. अन् चारचाकी वाहनाने नितीन आणि नातेवाईक तक्रार देण्यासाठी बोरगाव मंजू पोलीस ठाण्यात रवाना झाले.
वाटेतच त्यांना ट्रॅक्टर चालक जसीम जियायोध्दीन खतीब तसेच त्याचे साथीदार जियायोध्दीन रियाजोदीन खतीब, सलमान रहेमान खान आणि मजर रहेमान खान या चौघांनी नितीनच्या चारचाकी वाहनाला रस्त्यात अडवून लोखंडी पाईप तसेच दगडाने मारहाण केली. तक्रार न देण्यासाठी धमकी दिली. अखेर नितीनने पोलिसात तक्रार नोंदवली आणि चौघांवरही गुन्हे दाखल करण्यात आले. हे संपूर्ण प्रकरण आहे अकोला जिल्ह्यातील काटेपूर्णा गावातील.
या कारणांमुळे नितीननं उचललं टोकाचं पाऊल
नितीनच्या पोलिस तक्रारीनंतर जसीम जियायोध्दीन खतीब त्याचे साथीदार जियायोध्दीन रियाजोदीन खतीब, सलमान रहेमान खान आणि मजर रहेमान खान या चौघांकडून वारंवार धमक्या येत गेल्या. दिलेली तक्रार मागे घे, नाहीतर त्याचे परिणाम भोगायला तयार राहा, तसेच जीवे मारण्याची धमक्या देण्यात आल्या. यासंदर्भात त्याच्या नातेवाईकांकडे धमकीचे कॉल रेकॉर्डिंग उपलब्ध असल्याचं समजते. एवढं होत असताना पोलिसांनी साधी अटकेची कारवाई या चौघांवर केली नसल्याचं कुटुंबियांचं म्हणणं आहे. तसेच या चौघांच्या त्रासाला नितीन कंटाळला होता, त्यातूनच त्याने आत्महत्या सारखे टोकाचे पाऊल उचलल्याचा आोप आहे
दरम्यान काल सोमवारी सायंकाळी सहा वाजताच्या सुमारास काटेपूर्णा शेतशिवारात नितिनने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचं निदर्शनास आले. या प्रकारानंतर नातेवाईकांनी चांगलाच गोंधळ घातला. तसेच नितीनचा मृतदेह ताब्यात घेण्यासाठी टाळाटाळ सुरू होती, आधी संबंधित लोकांना अटक करा, त्यानंतरच नितीनचा मृतदेह ताब्यात घेतला जाईल, असा हट्ट धरला. गावातील काही ज्येष्ठ मंडळींनी मध्यस्थी करत कुटुंबीयांनी धरलेला हट्ट मागे घेतला आणि पोलिसांकडून कारवाईचं आश्वासन देण्यात आलं.
आत्महत्येपूर्वी लिहिली सुसाईड नोट
नितीनजवळ सुसाईड नोट आढळून आली आहे, त्यांनी आत्महत्या पूर्वी एका पानाची सुसाईड नोट लिहिलेली आहे, त्यामध्ये नमूद आहे की माननीय पोलीस अधीक्षक साहेब .. माझे काही दिवस अगोदर तक्रारीत नमूद असलेल्या चार लोकांसोबत वाद झाला होता. त्यानंतर त्यांच्याकडून नेहमी जिवे मारण्याच्या धमक्या येत होत्या. आता चारही लोकांवर आपण योग्य कारवाई कराल, अशी अपेक्षा व्यक्त करतोय. दरम्यान जर बोरगांव मंजू पोलिसांकडून वेळीच संबंधित व्यक्तींवर योग्य कारवाई झाली असती तर आज नितीनला आपला जीव गमवावा लागला नसता, अशाही चर्चा घटनास्थळी सुरू होत्या.
चारही लोकांवर गुन्हे दाखल
काल रात्री या प्रकरणात आत्महत्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी चारही लोकांवर बोरगाव मंजू पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहे. या अगोदर दाखल असलेल्या तक्रारीतील आरोपींचा शोध घेण्यात आला, पण त्यांचा कुठेही सुगावा लागत नव्हता. सध्याही चारही लोकांचा शोध आहे, लवकरच त्यांना गजाआड करण्यात येईल, असे बोरगाव मंजू पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक खंडारे म्हणाले.
नितिन नेमका कोण आहे?
नितिन मोहोड हे वंचित बहुजन आघाडीचे माजी तालुका युवा सचिव. तसेच युवा समाजसेवक, त्यांच्या पत्नी देखील वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकारी असून अकोला पंचायत समितीचे माजी पंचायत समिती सदस्य आहेत. दरम्यान नितिन गोरगरिबांच्या समस्या सोडवायाचा, गावात गरजूंना घरकुल मिळावे यासाठी अथक परिश्रम घ्यायचा. तसेच सरकारच्या प्रत्येक योजनेसाचा लाभ गावकऱ्यांना मिळावा यासाठी पाठपुरवठा करायचा.