<
गुंतागुंत व जोखीमीची थायरॉईडेक्टॉमी यशस्वी; महात्मा ज्योतिबा फुले योजनेत उपचार
जळगाव – (प्रतिनिधी) – आर्थिक परिस्थीती प्रतिकुल असल्याने थायरॉईडच्या आजाराकडे तब्बल ८ वर्ष दुर्लक्ष केलेल्या ३२ वर्षीय महिलेच्या गळ्यातून तब्बल ६०० ग्रॅमचा थायरॉईड काढण्यात डॉ.उल्हास पाटील रुग्णालयातील कान नाक घसा विभागाला यश आले. महात्मा ज्योतिबा फुले योजनेतून मोफत उपचाराचा रुग्णाला लाभ झाला असून डॉक्टरांसह नर्सिंग स्टाफने दिलेल्या सेवेमुळे हे सर्वात बेस्ट हॉस्पिटल असल्याची प्रतिक्रिया रुग्ण मंदा यांनी दिली.
सविस्तर वृत्त असे की, भुसावळ तालुक्यातील रहिवाशी मंदा ह्यांना मागील आठ वर्षापासून थायरॉईडचा आजार जडला होता. परंतु आर्थिक परिस्थीती हलाकीची असल्याने आजारपणाकडे दुर्लक्ष केले मात्र दिवसेंदिवस थायरॉईडची गाठ वाढत जावून त्याचा दाब श्वासनलिकेवर पडत होता परिणामी रुग्णाला श्वास घेण्यास खुप अडचण यायला लागली. पाठीवर झोपल्यावर श्वसन नलिका बंद व्हायची, त्यामुळे एकाच कुशीवर रुग्णाला झोपावे लागत होते. या परिस्थीती डॉ.उल्हास पाटील रुग्णालय रुग्णासाठी महत्वाचे ठरले. येथे इएनटी तज्ञांची भेट घेवून रुग्णाने तपासणी करुन घेतली. रुग्णाचा सीटीस्कॅनसह अन्य चाचण्या करण्यात आल्यात.
रिपोर्टनुसार डॉक्टरांनी रुग्णाला शस्त्रक्रिया तसेच त्यातील गुंतागुंतीची माहिती दिली. रुग्ण शस्त्रक्रियेला खुप घाबरत होती परंतु डॉक्टरांनी धिर दिला व शस्त्रक्रियेदरम्यान रुग्णाने देखील डॉक्टरांना सहकार्य केले आणि तब्बल ४ तासात गुंतागुंत व जोखमीची शस्त्रक्रिया भुलतज्ञांच्या सहकार्याने यशस्वी झाली. शस्त्रक्रिया आव्हानात्मक होती कारण यात रुग्णाची श्वासनलिका आकुंचन पावली असल्यामुळे श्वास कधीही बंद होण्याचा धोका होता. परंतु अनुभवी तज्ञांमुळे शस्त्रक्रिया यशस्वी झाली.
शस्त्रक्रिया व उपचारासाठी सहकार्य
कान-नाक-घसा विभागप्रमुख डॉ.अनुश्री अग्रवाल, डॉ.विक्रांत वझे, डॉ.पंकजा बेंडाळे, डॉ.तृप्ती भट यांनी शस्त्रक्रिया केली असून त्यांना भुलतज्ञ डॉ.देवेंद्र चौधरी, डॉ.शितल ढाके यांचे सहकार्य लाभले. तसेच निवास डॉ.चारु, डॉ.रितू, डॉ.बासु, डॉ.जान्हवी यांच्यासह नर्सिंग स्टाफने काळजी घेतली.
आव्हानात्मक शस्त्रक्रिया यशस्वी
थायरॉईड ग्रंथी मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे श्वास नलिका दाबली जात होती. परिणामी श्वासनलिकेचा व्यास २.५ एमएम इतका झाला होता. सर्वसामान्य व्यक्तीमध्ये तो २० एमएम इतका असतो. ऑपरेशनदरम्यान रुग्णामध्ये श्वास नलिकेची नळी टाकणे हे खूप मोठे आव्हान होते. मात्र, सर्वांच्या प्रयत्नांना यश आले आणि आज रुग्ण सुखरुप व आनंदी आहे.
- डॉ.अनुश्री अग्रवाल, विभागप्रमुख, कान-नाक-घसा