
जळगावात अवकाळी पावसाचा कहर, वीज कोसळल्याने ९ बकऱ्या ठार; सुदैवाने गुराखी बचावला
9 goats killed by lightning : जळगावात अवकाळी पावसाने तडाखा दिला असून येथे वीज कोसळून ९ बकऱ्या ठार झाल्या आहेत. या दुर्घटनेत गुराखी किरकोळ जखमी झाला आहे.
April 8, 2023
जळगाव : जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर तालुक्यातील रामगड येथील तलावाच्या भिंतीजवळ विज कोसळल्याने ९ बकऱ्या ठार झाल्याची दुर्देवी घटना शुक्रवारी दुपारी साडेचारच्या सुमारास घडली आहे. यात सुदैवाने गुराखी बालंबाल बचावला आहे. या घटनेने मोठी खळबळ उडाली. अवकाळी पावसाच्या बकऱ्या बळी ठरल्या आहेत.
रामगड येथील पशुपालक अतुल बिलाले स्वत:च्या शेळ्यासह इतरांच्या शेळ्या चारण्याचे काम करतात. तो नेहमीप्रमाणे शेळ्या चारण्यासाठी शुक्रवारी वस्ती जवळच्या पाझर तलावालगत गेला होता. दुपारी साडे-चार वाजण्याच्या सुमारास ढगांच्या आणि विजांच्या कडकडाटासह अवकाळी पावसाला सुरुवात झाली. बकऱ्यांना चारुन आल्यानंतर अतुल हा घराकडे परतीच्या वाटेवर असतांना अचानक शेळ्यांच्या कळपावर वीज कोसळली. नऊ शेळ्या जागीच ठार झाल्या. सुदैवाने बकऱ्यांपासून काही अंतरावर असल्याने अतुल हा बचावला आहे. त्यास किरकोळ दुखापत झाली असून उपचारार्थ मुक्ताईनगर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
या घटनेत गुलाबसिंग बिलाले यांच्या ५ शेळ्या, तारासिंग बिलाले यांच्या ३ शेळ्या, लटु बिलाले यांची १ अशा एकुण ९ शेळ्या मृत्युमुखी पडल्या असल्याची माहिती मिळाली आहे. दरम्यान शेवटचे वृत्त हाती आले तोपर्यत प्रशासनाकडुन घटनास्थळी पंचनाम्याची प्रक्रिया सुरु होती. मुक्ताईनगर उचंदे येथील पशुवैद्यकिय अधिकारी डॉ प्रशांत लोढे यांनी घटनास्थळाकडे तातडीने धाव घेत मृत शेळ्यांचे शवविच्छेदन केले.
गेल्या काही दिवसांपासून जळगाव जिल्ह्यात कडाक्याच्या उन्हाने नागरिक होरपळून निघाले होते. आज सकाळपासून ढगाळ वातावरण असल्याने ऊन सावलीचा खेळ सुरु होता. त्यामुळे नागरिकांना काहिसा उकाड्यापासून दिलासा मिळाला. सकाळच्या सुमारास जिल्ह्यात काही गावांमध्ये अवकाळी पावसाने हजेरी लावली. तर पुन्हा सायंकाळच्या सुमारास वातावरणात अचानक बदल झाला व वादळी वारा सुरु होवून काही ठिकाणी अवकाळी पावसाने हजेरी लावली.
अवकाळी पावसामुळे शेतात कापूस ठेवलेला गहू यासह विविध पिकांचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त होत आहे. तर दुसरीकडे याच अवकाळी पावसाने शेळ्यांचा बळी घेतल्याचेही बोलले जात आहे.