<
जळगाव-(प्रतिनिधी) – दिनांक ०८-११-२०१८ रोजी जळगाव रेल्वे स्टेशन परिसरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोरील रस्त्यावर संध्याकाळी साडेसहा ते पावणेसात वाजेचे दरम्यान रिक्षाचालक इस्माईलशहा गुलाबशहा उर्फ माल्ल्या, रा. जळगाव याचा आरोपी नितीन जगन पाटील उर्फ पपई, रा. आव्हाणे, ता. जि. जळगाव याने पुर्वीच्या भांडणावरुन चाकूचे एकूण नऊ घाव घालून निर्घृण खून केला व ही घटना फिरोजखान रज्जाकखान, आसिफशहा ईसाकशहा, जावेदशहा, अकबरशहा, आरिफशहा लतिफशहा यांनी पाहिली, अशी फिर्याद या खूनप्रकरणी मयताचा भाऊ लतीफशहा गलाबशहा रा. मास्टर कॉलनी बॉम्बे बेकरीजवळ, मेहरूण ता.जि. जळगाव याने त्याच दिवशी रात्री शहर पोलीस स्टेशन जळगाव येथे दाखल दिली होती. त्यावरून, त्याचदिवशी रात्री साडेबारा वाजता आरोपी नितीन पाटील उर्फ पपई यास पोलीसांनी सदर खुनाच्या आरोपाखाली अटक केली होती व तेव्हापासून तो जळगाव कारागृहातच होता.
सदर खटला चौकशीच्या वेळी सरकार पक्षातर्फे फिर्यादी लतीफशहा गुलाबशहा, प्रत्यक्षदर्शी साक्षीदार फिरोजखान रज्जाकखान, प्रकाश यशवंत देवरे, पुरुषोत्तम उर्फ गरबड पुना सोनवणे, मयताची पत्नी नसरीनबी, तसेच घटनास्थळ पंच, हत्यार जप्ती पंच, आरोपीचे, मयताचे व मयतास वाचविण्याचा प्रयत्न करणारे प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांचे कपडेजप्ती पंच, वैद्यकीय अधिकारी डॉ. निलेश देवराज, सहाय्यक पोलीस निरिक्षक सुनंदा पाटील, तपासी अंमलदार पोलीस निरीक्षक एकनाथ पाडळे, दाखल अंमलदार अभिमन्यू ईंगळे व ईतर अन्य असे एकूण १७ साक्षीदार तपासण्यात आले.
साक्षीदारांच्या जबानीतील तफावती व साक्षीपुराव्याबातची अविश्वासार्हता, तपास कामातील त्रुटी व अन्य महत्वपूर्ण बाबींचा विचार होऊन जळगाव जिल्हा व सत्र न्यायाधीश सौ. एस. एस. सापटणेकर यांनी आरोपी नितीन जगन पाटील उर्फ पपई याची निर्दोष मुक्तता केली.
आरोपीतर्फे ॲड. वसंत आर. ढाके यांनी बचावाचे कामकाज पाहिले. त्यांना ॲड. प्रसाद ढाके, ॲड. निरंजन ढाके, ॲड. शाम जाधव यांनी सहकार्य केले.